Menu Close

भगवद्गीता केवळ कथा नाही, तर विज्ञान आहे ! – डॉ. विजयकुमार डॅश

डॉ. डॅश यांना ग्रंथ भेट देतांना डॉ. ज्योती काळे

पुणे : भगवद्गीता ही केवळ कथा नसून त्यामध्ये विश्‍वाला मंगलमय करणारे विज्ञान सामावलेले आहे. ती जर केवळ गोष्ट असती, तर दहा सहस्र वर्षे टिकलीच नसती, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार डॅश यांनी केले. पतंजली योग समितीच्या वतीने १४ मे या दिवशी सावरकर अध्यासन केंद्र येथे डॉ. डॅश यांचे ‘भगवद्गीतेतील गूढ विज्ञान’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. डॅश हे भारतीय वंशाचे अमेरिकेतील नावाजलेले शास्त्रज्ञ असून यांनी इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई, डॉ. सतीश धवन, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासमवेत विविध क्षेत्रांत संशोधनकार्य केले आहे. ते गीतेतील विज्ञानवादी संकल्पनांवर संशोधन करत आहेत. कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. डॅश यांचे सहकारी श्री. सच्चिदानंद कुलकर्णी, एम्आयटीचे श्री. मिलिंद पांडे, पतंजली योग समितीचे श्री. बापू पाडळकर, श्री. गोविंद गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘वैज्ञानिक नास्तिक असतात, हा एक अपसमज आहे. वैज्ञानिक हा आस्तिक असून तो सत्याला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. भगवद्गीता ही केवळ हिंदूंसाठी नाही. सर्व प्राणीमात्रांनी भगवद्गीतेचा आश्रय घ्यायला हवा. समाजाच्या पवित्र उन्नतीसाठी (Holistic Development) भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान आचरणात आणायला हवे.’’

१५ मे या दिवशी झालेल्या त्यांच्या व्याख्यानाच्या वेळी त्यांनी ‘निःस्वार्थ सेवेतूनच आनंद मिळतो. मनुष्याच्या इच्छा, अपेक्षा संपायला हव्यात. मूल्याधारित समाजव्यवस्था निर्माण व्हायला हवी’, असे सूत्र सांगून आध्यात्मिक मार्गदर्शन केले.

भगवद्गीतेतील संकल्पनांवर आधारित बनवली नानाविध उपकरणे

डॉ. डॅश यांनी आतापर्यंत भगवद्गीतेतील संकल्पनांवर आधारित अनेक उपकरणे बनवली असून त्यातील काही उपकरणे आणि त्यांची माहिती या वेळी सांगण्यात आली. ग्लास स्पीकर्स, भूमीविरहित शेती, विषाणूंचा प्रसार रोखणारे अ‍ॅन्टिबायोटिक लॅम्प, उर्जानिर्मिती करणारे सूर्यफूल आदी, जलशुद्धीकरण प्रमुख उत्पादनांची माहिती प्रेझेंटेशनच्या माध्यमातून या वेळी देण्यात आली.

ही सर्व उपकरणे स्वस्त असून या आधीच्या सरकारने या उत्पादनांच्या वापराच्या संदर्भात स्वारस्य दाखवले नाही. या उत्पादनाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अवगत करण्यात येणार असून त्यासंदर्भात सकारात्मक फलनिष्पत्ती निघाली, तर उर्जा निर्मितीमध्ये भारत स्वयंपूर्ण होऊन देशाची महासत्ता होण्याकडे वाटचाल गतीने होईल, असे डॉ. डॅश यांनी सांगितले.

ज्ञान आणि विनम्रता यांचा संगम असलेले डॉ. डॅश

उच्चशिक्षित आणि विद्वान असूनही डॉ. डॅश अत्यंत नम्र होते. कार्यक्रमाच्या वेळी  त्यांची ओळख करून देतांना ते नमस्काराच्या मुद्रेत लीन होऊन बसले होते. त्यांच्या व्याख्यानात त्यांनी भगवद्गीतेतील अनेक श्‍लोक सहजरित्या अर्थ सांगून उद्धृत केले. श्‍लोक म्हणत असतांना ‘श्‍लोकांचा अर्थ त्यांना उलगडलेला असून त्यांतील आनंद ते घेत आहेत’, असे जाणवत होते. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी आयोजकांच्या आग्रहावरून एक भजनही म्हणले. कार्यक्रमानंतर त्यांना भेटणार्‍या जिज्ञासूंशी ते प्रेमाने बोलत होते.

या वेळी डॉ. डॅश यांना महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या डॉ. ज्योती काळे यांनी ‘महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालय’ हा ग्रंथ भेट दिला. त्यांचे १५ मे या दिवशीही व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्यांची पुन्हा भेट घेऊन त्यांना ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’विषयी विस्तृत माहिती सांगितली. त्या वेळी त्यांनी ‘तुमचा ग्रंथ वाचला. पुष्कळ छान आहे. तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे. अशा कार्याची पुष्कळ आवश्यकता आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *