वॉशिंग्टन : कॅलिफोर्नियामधील प्रस्तावित शालेय पाठ्यपुस्तकात हिंदुत्व आणि भारताबाबत कथित नकारात्मक लिखाण छापल्यावरून अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय-अमेरिकी समुदायाच्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अमेरिकेतील हिंदू एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक शांताराम नेक्कर यांनी याबाबत नाराजी व्यक्त करताना म्हटले की, हिंदू-अमेरिकी समुदायाने दशकांपर्यंत जागृती अभियान राबवल्यानंतर देखील शालेय पुस्तकांमध्ये, विशेषत: हगटल मिफलिन हारकोर्ट, मॅकग्रा-हिल, डिस्कव्हरी आणि नॅशनल जॉग्रफीच्या पुस्तकांमध्ये भारतीय संस्कृतीबाबत चुकीची माहिती छापण्यात आली आणि हे निराशाजनक आहे अशी प्रतिक्रिया अमेरिकेतील हिंदू एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक शांताराम नेक्कर यांनी व्यक्त केली आहे.
सॅक्रामेंटो येथे कॅलिफोर्नियाच्या शिक्षण विभागातर्फे काल आयोजित केलेल्या सार्वजनिक सुनावणीदरम्यान नेक्कर यांनी हे भाष्य केले आहे. खरेतर गेल्या अनेक दशकांपासून भारतीय-अमेरिकी समुदाय शालेय पुस्तकांमधील हिंदुत्वाबाबत अनेक चुका आणि मिथकांना हटवण्यात यावे यासाठी अभियान चालवतो आहे असे नेक्कर यांचे म्हणणे आहे. मात्र ही शालेय पुस्तके शिक्षण विभागाच्या फ्रेमवर्कवर आधारीत असल्याचे स्पष्टीकरण कॅलिफोर्निया सरकारने दिले आहे.
भारताबाबत अनेक नकारात्मक बाबी छापण्यात आल्या असून कॅलिफोर्नियातील काही शालेय पुस्तकांमध्ये भारताचा उल्लेख ‘दक्षिण आशिया’ असा करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांच्या काळाच कॅलिफोर्नियात विद्वान, विद्यार्थी आणि नागरिकांकडून विविध प्रकारच्या सूचना आणि सल्ले प्राप्त झाल्यानंतर पाठ्यपुस्तकातील तपशीलात बदल करण्यात आले आहेत. विशेषत: योग आणि धर्म अशा हिंदू संकल्पना, महर्षी व्यास, वाल्मिकी, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कामगिरीबाबतच्या तपशीलांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
काही प्रकाशकांनी हिंदुत्वाला बदनाम करणे सुरूच ठेवले असल्याची प्रतिक्रिया सॅनजोसचे रहिवाशी शरत जोशी यांनी व्यक्त केली आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदुत्वाच्या नकारात्मक चित्रणामुळे वर्गातील हिंदू मुलांना अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागतो अशी माहितीही जोशी यांनी दिली आहे.
संदर्भ : मटा