Menu Close

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रीराम सेनेकडून महामृत्युंजय याग

धारवाड (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियान

यज्ञाच्या वेळी विधी करतांना १. श्री. प्रमोद मुतालिक, त्यांच्या बाजूला सनातनचे साधक २. श्री. राघवेंद्र माणगावकर आणि ३. सौ. रेखा माणगावकर

धारवाड (कर्नाटक) : ‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना दीर्घायुष्य मिळावे’, यासाठी त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीराम सेनेकडून १८ मे या दिवशी येथे ‘महामृत्युंजय याग’ आणि ‘श्रीराम तारक होम’ करण्यात आला. या प्रसंगी प्रसिद्ध वैद्य डॉ. एस्.आर्. रामनगौडर, धारवाड येथील श्री जगद्गुरु शंकराचार्य पाठशाळेचे पं. नागेशशास्त्री जोशी, सहकारी धुरीण संघटनेचे श्री. रवी एलिगार, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विदुला हळदीपूर आदी मान्यवर उपस्थित होते.

प.पू. गुरुदेवांची कृपा सदैव आमच्यावर आहे ! – श्री. प्रमोद मुतालिक

देशात अनेक ऋषिमुनी होऊन गेले. या ऋषिमुनींच्या मांदियाळीतील प.पू. गुरुदेव आहेत. माझ्या संकटकाळी त्यांच्या कृपेने मला आध्यात्मिक आधार मिळाला. गोव्यात मला प्रवेशबंदी असल्यामुळे गेल्या ३ वर्षांपासून मला प.पू. गुरुदेवांच्या आश्रमात जाता आले नाही. त्यामुळे जणू आईपासून मुलाला दूर केल्यासारखे वाटत आहे. याचे दुःख मला अजूनही आहे. त्या सरकारचा मी धिक्कार करतो. प.पू. गुरुदेव गोव्यात असले, तरी त्यांची कृपा सदैव आमच्यावर आहे, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी काढले. या वेळी श्री. मुतालिक यांनी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले, तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली.

प.पू. डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्यास आपण दोषमुक्त होऊ ! – पं. नागेशशास्त्री जोशी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे सत्पुरुष मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे. अशांच्या संपर्कात येऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्यास आपण दोषमुक्त होऊ !

आपण भारतमातेचे ऋण फेडले पाहिजे ! – डॉ. रामनगौडर

देशात अनेक संत, धर्मगुरु आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना असल्यामुळे अनेक आक्रमणे होऊनही आपली भारतभूमी अजूनही समर्थ आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले जसे देश आणि धर्म यांसाठी कार्य करत आहेत, तसे कार्य आपणही केले पाहिजे. आपण निष्काम भावाने कार्य केले, तर निसर्गदेखील आपल्याला साहाय्य करतो. आपल्या धमन्यांमध्ये देशभक्ती सळसळली पाहिजे. भारतमातेचे ऋण आपण फेडले पाहिजे.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमस्थळी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची मोठी प्रतिमा ठेवण्यात आली होती.

२. अनेक वक्त्यांनी प.पू. गुरुदेवांना पाहिलेही नसतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या साधनेद्वारे आलेल्या अनुभूतींमुळे वक्ते अत्यंत कृतज्ञताभावाने बोलत होते.

३. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या सौ. विदुला हळदीपूर यांनी ‘राज्यघटनेत शेवटची सुधारणा करून भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करावे’, असे सांगताच सर्वांनी जोरात टाळ्यांचा कडकडाट करून संमती दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *