इस्लामाबाद : १९९० च्या दशकात पंतप्रधान असतांना आर्थिक गैरव्यवहार करून शरीफ आणि त्यांच्या मुलाने लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पनामा पेपर्समधून हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची नोंद घेऊन संयुक्त अन्वेषण पथक (जेआयटी) स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर शरीफ यांनी पंतप्रधानपदावर रहाणे अयोग्य आहे. त्यांनी ७ दिवसांत त्यागपत्र द्यावे, अन्यथा देशभरात तीव्र आंदोलन उभारू, अशी चेतावणी पाकमधील शरीफविरोधी अधिवक्त्यांनी दिली आहे.
शरीफ समर्थक अधिवक्त्यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून चौकशीचा अहवाल येईपर्यंत शरीफ यांनी त्यागपत्र देण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात