कोल्हापूर : ६८ कोटी रुपयांचा पहिला श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा राज्याच्या मुख्य सचिवांच्या उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात येणार आहे. १५ दिवसांत समितीकडून मान्यता मिळेल. त्यानंतर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली असणार्या शिखर समितीकडे पाठवला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी २० मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि पालकमंत्री सकारात्मक आहेत. त्याविषयी मुख्य सचिवांसोबत बैठक आयोजित केली जाईल. शिखर समितीची मान्यता मिळताच निधीविषयी प्रयत्न केले जातील. आराखड्याच्या अंतर्गत भाविकांची सोय पहाणे हिताचे आहे.
१. श्री. चंद्रकांत दळवी यांनी मंदिर सुरक्षा आणि वाहनतळाचा आढावा घेऊन अधिकार्यांना आवश्यक सूचना दिल्या. श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्याच्या अनुषंगाने आवश्यक स्थळांना भेटी देऊन पाहणी केली.
२. मंदिर वास्तू संवर्धनाचे काम हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती करणार असल्याने देवस्थान समिती पदाधिकार्यांकडून याविषयाची माहिती घेऊन मंदिरातील या वास्तूंची पाहणी केली.
३. जोतिबा डोंगरावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेसाठी देवस्थान समितीने एजन्सी नियुक्त करून १ जूनपासून स्वच्छता मोहीम राबवावी आणि स्वच्छतेचे काम अखंड चालू ठेवावे.
श्री यमाई मंदिर परिसर सुशोभिकरण करण्यात यावे. जोतिबा विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित कामांची समितीने प्रत्यक्ष भूमीवर जाऊन पाहणी करावी आणि कामाचा आराखडा सिद्ध करावा, असे निर्देश आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात