Menu Close

विक्रोळी येथील युवा शौर्य जागरण शिबिरात स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेण्याची मागणी !

शिवकार्य प्रतिष्ठान संघटनेच्या पुढाकाराने शिबिराचे आयोजन

लाठी काठीची प्रात्यक्षिके करतांना शिबिराला उपस्थित धर्माभिमानी युवक

मुंबई : येथील शिवकार्य प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने विक्रोळीतील कन्नमवारनगर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात युवा शौर्य जागरण शिबीर पार पडले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या या शिबिराची संपूर्ण सिद्धता कार्यकर्त्यांनीच केली होती. धर्माभिमान्यांनी आठवड्यातून एकदा स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेण्याची मागणी केली. शिबिराच्या आरंभी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती, ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवकार्य प्रतिष्ठानचे श्री. ओंकार कोलते यांनी सूत्रसंचालन, तर हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी शिबिराचा उद्देश आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले. श्री. करण परब यांनी उपस्थितांकडून लाठीची प्रात्यक्षिके करवून घेतली. शेवटी सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध रहाण्याची प्रतिज्ञा केली. धर्माभिमान्यांनी शिबिरात उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.

स्वसंरक्षण प्रशिक्षण घेेणे ही काळाची आवश्यकता ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्यांचा पराभव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. क्रांतिकारकांच्या शौर्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतियांना पूर्वीपासून शौर्याची परंपरा लाभली आहे. सध्या देशावर येणारी संकटे पहाता प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे ही काळाची आवश्यकता आहे. राष्ट्र-धर्म प्रेमाच्या ठिणगीचा वणवा पेटून तो प्रत्येक हिंदूच्या मनात जागृत करणे हे आपले दायित्व आहे. संतांच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्र येणारच आहे; मात्र आपण धर्मकर्तव्य म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *