मुंबई : येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स परिसरातील आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाची २१ मे या दिवशी स्वच्छता करण्यात आली. यामध्ये विश्व हिंदु परिषदेचे श्री. विनय ठावरे, धर्माभिमानी सर्वश्री नीलेश भागडे, रमेश महागावकर, नवनाथ कदम, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजू दवंडे, प्रदीप दवंडे, राहुल मोरे, प्रसाद मानकर आदी हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
प्रारंभी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर श्री. प्रसाद मानकर यांनी राष्ट्रपुरुषांचे स्मारक स्वच्छ करण्यामागील उद्देश सांगितला. या वेळी कचरा काढून स्मारक पाण्याने स्वच्छ करण्यात आले. स्वच्छतेनंतर पुष्प अर्पण करून आद्य क्रांतीकारक बासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन करण्यात आले. स्मारकाची देखभाल पहाणारे श्री. रवी भोईर यांना सुट्टी असूनही ते स्मारकाच्या स्वच्छतेत सहभागी झाले.
राष्ट्रासाठी क्रांतिकारकांप्रमाणे त्याग करण्याची आवश्यकता ! – प्रसाद मानकर, हिंदु जनजागृती समिती
इतिहास पुसला जात नाही. इतिहासातून स्मृतींना उजाळा मिळतो. क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांनी राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग केला. अशाच त्यागाची आज राष्ट्राला आवश्यकता आहे. क्रांतीकारकांपासून प्रेरणा घेऊन संघटितपणे हे राष्ट्रकार्य आपल्याला करायचे आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन ठिकठिकाणी लावण्यात येत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात