कोल्हापूर : उंचगाव गावातील मदरसा आणि मशिदी यांवरील भोंग्यांमधून पुष्कळ आवाज येतो. त्याचा त्रास परिसरात रहाणारे वयोवृद्ध, आजारी, हृदयविकार असलेले नागरिक आणि लहान मुले यांना होतो. त्यामुळे मदरसा आणि मशिदी यांवरील भोंगे काढून घेण्यात यावेत, असा ठराव उंचगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत २२ मे या दिवशी एकमताने मान्य करण्यात आला. (उंचगाव गावातील मदरसा आणि मशिदी यांवरील भोंगे काढण्यासाठी ग्रामसभेत ठराव करणारे उंचगाव ग्रामस्थ अन् हिंदुत्वनिष्ठ यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या जनतेने संघटित होऊन अशा अवैध कृत्यांच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
ठराव केल्यानंतर उंचगाव गावात सामाजिक सलोखा राखला जावा आणि कायदा-सुव्यवस्था बिघडू नये; म्हणून गांधीनगर पोलीस ठाण्यात कळवण्यात यावे, अशी सूचनाही श्री. धनराज गुळवे यांनी ठरावाद्वारे केली. त्याला श्री. सचिन चौगले यांनी अनुमोदन दिले. ठरावावर सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या स्वाक्षर्या आहेत.
हिंदु जनजागृती समितीचे मनोज खाडये यांनी केलेल्या आवाहनाला उंचगाव ग्रामस्थांकडून प्रतिसाद !
शिवजयंतीच्या निमित्ताने उंचगाव येथील श्री मंगेश्वर मंदिराजवळ २८ एप्रिलला संयुक्त शिवजयंती उत्सव, उंचगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने मशिदींवरील भोंगे हटवावेत, यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे’, असे आवाहन उपस्थितांना केले होते. उंचगाव ग्रामस्थांनी वरीलप्रमाणे ठराव करून श्री. खाडये यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
उपस्थित मान्यवर
ग्रामसभेत सरपंच सौ. सुरेखा चौगुले, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री अजित पाटील, विजय गुळवे, लखन जाधव, युवा सेनेचे माजी तालुका प्रमुख श्री. संतोष चौगुले, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. राजू चौगुले, शिवसेनेचे श्री. विक्रम चौगुले, मनसेचे श्री. अभिजित पाटील, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री पांडुरंग घुणके, सूरज पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात