इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अटक झालेला भारतीय नागरिक शेख नबी अहमद मुंबईच्या जोगेश्वरचा रहिवासी आहे. पाकिस्तानने रविवारी त्याला अटक केली.
मुंबई पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नबी मागील १२ वर्षांपासून पाकिस्तानात आहे, तर आवश्यक कागदपत्रे नसल्याच्या आरोपातून पाकिस्तान सरकार त्याला आताच का अटक केल्याचे दाखवत आहे ? असा प्रश्न तपास यंत्रणांना पडला आहे.
शेख नबीने दशकभर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयसाठी काम केले असून अर्धाडझन भारताविरुद्धच्या कारवायांमध्ये त्याचा हात होता. काश्मीरमधून पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न फसल्यानंतर तो बांगलादेशमार्गे पाकिस्तानात पोहोचला होता, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिस अधिकाऱ्यानुसार, २००६ मध्ये गुलबर्गामध्ये एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीनंतर महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरीतील सुमारे डझनभर लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याचवेळी तीन लोक बेपत्ता होते. यामध्ये शेख नबीही होता. तो २००५ पासून बेपत्ता होता. ज्या डझनभर लोकांना पकडले होते, त्यांना त्यांच्या आई-वडिलांसमोर समज देऊन सोडण्यात आले.
शेख नबीवर मुंबई पोलिसात गुन्हेगारी प्रकरणं दाखल आहेत. त्यामुळे पोलिस सातत्याने त्याच्या घरी चौकशीसाठी येतात. २००६ च्या रेल्वे स्फोट आणि औरंगाबाद शस्त्रास्त्र प्रकरणातही पोलिस त्याचा शोध घेत होते.
संदर्भ : एबीपी माझा