‘लाना होगा, लाना होगा हिंदु राष्ट्र लाना होगा,’च्या घोषणांनी दुमदुमला आसमंत । वीरश्रीसह साधकांच्या भक्तीभावाने चैतन्यरूपात अवतरला भगवंत ।
सोलापूर : येथे २४ मे या दिवशी भव्य हिंदु एकता दिंडी पार पडली. जाजूभवन बाळीवेसपासून दिंडीला प्रारंभ होऊन हुतात्मा चार पुतळा येथे सांगता करण्यात आली. दिंडीमध्ये विविध संप्रदायाचे आणि सनातनचे साधक, हितचिंतक, समितीचे कार्यकर्ते मिळून ५५० हून अधिक जणांनी ‘लाना होगा, लाना होगा हिंदु राष्ट्र लाना होगा’, अशी घोषणा देत हिंदुत्वाचा जागर केला. प्रारंभी तळे हिप्परगा येथील माजी सरपंच श्री. राजाभाऊ हौशेट्टी आणि बार असोसिएशनचे अधिवक्ता लक्ष्मण मारडकर यांनी धर्मध्वजाचे भावपूर्ण पूजन केले. श्री. शैलेश जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले. त्यानंतर श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमित कदम यांनी शंखनाद केला. दिंडीमध्ये फुलांनी सजवलेल्या रथात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवले होते. दिंडीमधील बालसाधकांनी राष्ट्रपुरुष यांची वेशभूषा करून प्रबोधन केले. दिंडीदरम्यान सनातनच्या ग्रंथांचे वितरणही करण्यात आले. काही ठिकाणी सनातन प्रभातचे वाचक आणि हितचिंतक यांनी धर्मध्वजाला हार घालून दिंडीवर पुष्पवृष्टी केली. दिंडीमध्ये अनेक हिंदुत्वनिष्ठ आपल्या कुटुंबियांसमवेत सहभागी झाले होते. इस्कॉन आणि पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या योग वेदांत सेवा समितीचे साधकही सहभागी झाले होते. संपूर्ण दिंडीमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवून सर्वांचीच भावजागृती होत होती.
दिंडीवर ठिकठिकाणी करण्यात आलेली पुष्पवृष्टी
१. चाटी गल्ली येथील व्यापारी संघटनेच्या वतीने श्री. गोपाल सोमाणी आणि कुटुंबियांनी दिंडीला हार घालून पुष्पवृष्टी केली.
२. सराफ असोसिएशनच्या वतीने श्री. प्रेम झाड यांनी धर्मध्वजाला हार घालून पुष्पवृष्टी केली.
३. मधला मारुति येथील आनंद स्विट्सचे मालक श्री. आनंद मोटगी आणि नडगिरे पेंट्सचे श्री. नडगिरे यांनी धर्मध्वजाला हार घालून स्वागत केले. विजयकुमार निरोळे यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.
४. भांडेगल्ली येथील सौ. पूजा मंठळकर यांनी धर्मध्वजाला औक्षण करून पृष्पवृष्टी केली.
५. आजोबा गणपति येथील आजोबा गणपति ट्रस्टचे श्री. गंगाधर गवसने यांनी दिंडीवर पुष्पवृष्टी केली.
६. जुनी फौजदार चावडी येथील बिराजदार मेडिकलचे श्री. अमरनाथ बिराजदार आणि संजय हिरेमठ यांनी धर्मध्वजाला हार घालून स्वागत केले.
७. सोन्या मारूति चौकातील श्री. श्रीकांत सरवदे यांनी धर्मध्वजाला हार घालून दिंडीचे स्वागत केले.
८. दत्त चौकातील शुभराय मठाच्या श्रीमती शुभांगीबुवा यांनी औक्षण करून दिंडीचे स्वागत केले.
प्रभावी हिंदु ऐक्य हाच हिंदु राष्ट्राचा पाया ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
आज देशात हिंदूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आपली देवालये, गोमाता सुरक्षित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी देवालये, गोमाता यांचे रक्षण केले होते.
आज मात्र परिस्थिती विरुद्ध आहे. या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक आहे आणि हाच हिंदु राष्ट्राचा पाया ठरणार आहे.
आज प्रत्येकजण पक्ष, संप्रदाय बाजूला सारून हिंदू म्हणून एकत्र आले आहेत. आजची दिंडी म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने घौडदौड करणारा अश्व होय.
हिंदु राष्ट्र हेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे जीवित कार्य ! – सौ. अनिता बुणगे, सनातन संस्था
वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार, असे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी १९९८ या वर्षीच सांगितले होते. आजची दिंडी त्याची पायाभरणी आहे.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी व्यष्टी साधनेसाठी गुरुकृपायोग, तर समष्टी साधनेसाठी हिंदु राष्ट्राची स्थापना सांगितली आहे. यांनुसार आचरण केल्यास आपल्या जीवनाचा निश्चितच उद्धार होणार आहे.
समष्टीच्या कल्याणार्थ अहोरात्र झटणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्राची स्थापना हेच जीवित कार्य आहे.
हिंदुत्वनिष्ठांचे तेजस्वी विचार
धर्माविषयी जागृती केल्याची पोच म्हणून ‘हिंदु एकता दिंडी’ ! – अधिवक्ता लक्ष्मण मारडकर, अध्यक्ष, बार असोसिएशन
स्वसंस्कृतीचा विसर पडल्यामुळे हिंदू पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदूंमध्ये धर्माविषयी जागृती केल्याची पोच म्हणून आजची ही हिंदु ऐक्य दिंडी आहे.
आपण हिंदु असल्याचा अभिमान बाळगायला हवा ! अधिवक्ता श्रीमती अपर्णा रामतीर्थकर, सामाजिक कार्यकर्त्या सोलापुरात लव्ह जिहादचा मोठा धोका असून अनेक हिंदु मुली धर्मांतरित झाल्या आहेत. आपला धर्म, देवळे, महिला असुरक्षित आहेत याची जाणीव हिंदूंना करून द्यावी लागत आहे. आपण हिंदु असल्याचा अभिमान बाळगायला हवा.
क्षणचित्रे
१. भगवे फेटे आणि भगवा ध्वज यांमुळे वातावरण भगवेमय झाले होते.
२. समाजातील एका व्यक्तीने दिंडीकडे पाहून भावपूर्ण नमस्कार केला.
३. दिंडीच्या सांगतेपूर्वी एक गाय बराच वेळ हंबरत होती.
४. स्थानिक वृत्तवाहिनी ‘ईन चॅनल’ने संपूर्ण दिंडीचे सातत्याने प्रक्षेपण केले.
हिंदूंवर विनाकारण निर्बंध घालणारे हिंदुद्वेषी पोलीस !
दिंडीचा समारोप हुतात्मा चार पुतळा येथे होणार होता; मात्र ऐनवेळी पोलिसांनी समारोपाची सभा पत्रकार भवन क्षेत्रात घेण्यास सांगितली. तरीही हिंदु जनजागृती समितीने ते स्विकारले. (हिंदू पोलीस आणि प्रशासन यांच्या चौकटीत राहून कार्य करतात, याउलट धर्मांध पोलिसांवरच आक्रमणे करतात. ही स्थिती असूनही हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांना मात्र मोकळीक देतात. त्यामुळे पोलीस संकटात असतांना हिंदूंनी तरी त्यांना साहाय्य का करावे, असे कोणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून १२ सहस्रांहून अधिक जणांनी हिंदु एकता दिंडी अनुभवली !
हिंदु एकता दिंडीचे ‘फेसबूक’ या सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून ‘लाईव्ह’ प्रक्षेपण करण्यात आले. १२ सहस्रांहून अधिक जणांनी फेसबूकच्या माध्यमातून दिंडी पाहिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात