Menu Close

संशयास्पद हालचालींमुळे पाकिस्‍तानमध्ये १८२ मदरसे बंद

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पेशावरच्या शाळेतील दहशतवादी हल्ल्यानंतर १८२ मदरसे बंद करण्यात आले. मूलतत्त्वाशी संबंधित धार्मिक शिक्षण संस्थांविरुद्धच्या अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली. प्रसारमाध्यमातील एका वृत्तात ही माहिती देण्यात आली. पेशावर दहशतवादी हल्ल्यात १५० जण ठार झाले होते. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे मदरसे पंजाब, खैबर पख्तुनख्वा आणि सिंधमध्ये आहेत. या मदरशांत संशयास्पद कारवाया केल्या जात असल्याचे पुरावे मिळाले होते. दोन दिवसांपूर्वी एका अमेरिकी सिनेटरने म्हटले होते की, पाकिस्तानच्या २४००० मदरशांना सौदी अरेबियाकडून तगडी रक्कम मिळते. यामुळे तिथे दहशतवादाला प्रोत्साहन मिळते.

एक अब्ज रुपयांचे बँक खाते सील

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी संबंधित १२६ बँक खाती सील केली आहेत. यामध्ये जवळपास एक अब्ज रुपये होते. याशिवाय अधिकाऱ्यांनी जवळपास २५ कोटी रुपये जप्त केले.
सरकारने ८१९५ जणांची नावे काळ्या यादीत टाकली आहेत. १८८ नागरिकांना विदेशात जाण्याची परवानगी नाकारली आहे आणि २०५२ जणांचा प्रवास मर्यादित केला आहे. संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानमधील ७४ संघटना बेकायदा ठरवल्या आहेत. सरकारने दहशतवादाशी संबंधित १०२६ प्रकरणे दाखल केली आहेत आणि २३० अतिरेक्यांना पकडले आहे.
संदर्भ : दिव्य मराठी

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *