सातारा : तेलंगणा स्टेट ख्रिश्चन (अल्पसंख्यांक) फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीने चालू केलेल्या विशेष योजनेच्या अंतर्गत १० लक्ष रुपयांच्या आतील प्रकल्पात अनुदान मिळण्यासाठी पात्रता अटी घालण्यात आल्या आहेत. पहिली अट व्यक्ती ख्रिस्ती असायला हवी, ही आहे. त्यात ख्रिस्ती असल्याचा दाखला आणि बाप्तिस्मा केल्याचा दाखलाही जोडायला हवा. यामुळे गरीब असूनही केवळ हिंदू असल्याने शासकीय सुविधा मिळत नाहीत, असा संदेश याद्वारे जनतेमध्ये जाईल आणि हिंदूंमध्ये अन्यायाची भावना वाढीस लागेल. त्यानंतर अनुदान मिळवण्यासाठी धर्मांतर करून ख्रिस्ती बनण्याचे प्रकार चालू होतील. अशा प्रकारे धर्मांतराला प्रवृत्त करणारा आणि केवळ ख्रिस्त्यांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक साहाय्य देणारा तेलंगणा स्टेट ख्रिश्चन फायनान्स कार्पोरेशनचा निर्णय रहित करावा, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी केले. काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणार्या देशद्रोह्यांवर कठोर कारवाई करावी आणि सैनिकांना सर्वाधिकार द्यावेत, अशी मागणी येथे गोलबागेसमोर २१ मे या दिवशी हिंदुत्वनिष्ठांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
आंदोलनात समर्थ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु महासभा, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे ५० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
देशविरोधी घोषणा देणार्यांवर गुन्हे प्रविष्ट करावेत ! – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती
पाकिस्तानी सैन्याने २ भारतीय सैनिकांची हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली. वरिष्ठांकडून आदेश नसल्याने सैनिकांना हातात बंदुका असूनही धर्मांधांना चोख प्रत्युत्तर देता येत नाही, हे दुर्दैवी आणि भारतीय सैन्याचे मनोधैर्य खच्ची करणारे आहे. सैनिकांवर दगडफेक करणारे, देशविरोधी घोषणा देणारे यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करावेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात