हिंदु राष्ट्र स्थापनार्थ हिंदूंनी आत्मबळ निर्माण करावेे ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
उज्जैन (मध्यप्रदेश) : काश्मीरमध्ये भारताचा कायदा मानणे बंधनकारक नाही. त्यामुळे तेथे तिरंगा जाळणे, सैनिकांवर दगडफेक करणे, देशविरोधी घोषणा देणे, आदी कृत्ये देशद्रोही ठरत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या राज्यात कोणी देशद्रोही नव्हते. त्यांच्या राज्यात कोणी देशद्रोह केलाच, तर त्याला त्वरित कठोर शिक्षा मिळायची. त्यामुळे देशातील देशद्रोहावर एकच उपाय आहे, तो म्हणजे हिंदु राष्ट्र ! अशा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज, चंद्रगुप्त मौर्य, अर्जुन यांच्यासारखी तपस्या करून आत्मबळ निर्माण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उज्जैन येथील आनंदभवन येथे आयोजित कार्यक्रमात केले.
या प्रसंगी व्यासपिठावर उज्जैनचे नगराध्यक्ष श्री. सोनू गहलोत, सिंहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. दिवाकर नातू, नगरसेवक श्री संतोष व्यास, समाजसेवक प्रकाश चितौडा, प्रबुद्ध परिषदेचे संरक्षक श्री. राधेश्याम दुबे, प्रबुद्ध परिषदेचे अध्यक्ष श्री. आनंदीलाल जोशी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेश ज्ञानी आणि जागरणचे सचिव श्री. अरविंद जैन यांनी केले.
हिंदू धर्मशिक्षणाअभावी धर्मापासून लांब गेले ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
इंदूर (मध्यप्रदेश) : मुसलमानांना लहानपणापासून त्यांच्या धर्माचे शिक्षण मिळत आले. जीवनात काय करायचे, याविषयी त्यांची दिशा स्पष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण जगभर इस्लामचे राज्य आणण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. हिंदूंना मात्र धर्मशिक्षण न मिळाल्याने त्यांनी लॉर्ड मेकॉलेची शिक्षणपद्धती अवलंबली. परिणामी महान हिंदु धर्मापासून लांब गेल्याने त्यांंचे अध:पतन होत आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
हिंदु महासभेच्या वतीने १४ मे या दिवशी ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर येथील आर्यसमाज मंदिरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पू. डॉ. पिंगळे यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी हिंदु महासभेचे माजी अध्यक्ष श्री. पंडित पवन त्रिपाठी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपेक्षित हिंदु राष्ट्राची व्याख्या सांगितली, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु महासभेकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या कार्यक्रमाला पू. उमेशानंदजी महाराज, सभेचे प्रदेश महामंत्री जीतेंद्र ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष नीलेश दुबे उपस्थित होते. या कार्यक्रमाचा महासभेच्या १५० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी लाभ घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात