Menu Close

गणरायाच्या नगरीत हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर !

सांगली : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ३० मे या दिवशी येथे हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. गणरायाच्या नगरीत झालेल्या, वीरश्री निर्माण करणार्‍या दिंडींच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर पहायला मिळाला. दिंडीत ४०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. फेरीकडे पाहून चैतन्य आणि उत्साह जाणवत असल्याचे नागरिकांनीही सांगितले.

प्रथम झुलेलाल चौक येथे सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय सेवा संघटनेचे संस्थापक ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज यांनी धर्मध्वजाचे पूजन केले, तर वेदाचार्य लक्ष्मणशास्त्री मोटे यांनी श्रीफळ वाढवला. हिंदु एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष श्री. नारायणराव कदम यांच्या हस्ते गायीची पूजा करून दिंडी मार्गस्थ झाली. मारुति देवळाजवळ दिंडीचा समारोप झाला. रणरागिणी पथक, प्रथमोपचार पथक आणि महिला अधिवक्त्यांचे पथक हेही दिंडीचे वैशिष्ट्य होते. दिंडीमध्ये क्रांतिकारक, राष्ट्रपुरुष आणि संत यांच्या वेशभूषेतील बालचमूने लोकांचे लक्ष वेधून घेतले. ४ वर्षे वयापासूनची बालके दिंडीत सहभागी झाली होती.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. हरिदास कालिदास, श्री. प्रसाद दरवंदर, श्री. प्रमोद धुळुबूळू, श्री. सचिन पवार, माळी समाजाचे विश्‍वस्त श्री. श्रीकृष्ण माळी, शिवसेनेचे श्री. तानाजी सातपुते, शिवउद्योग सेनेचे श्री. तात्या कराडे, शिवलीला सांस्कृतिक कला मंचचे संस्थापक श्री. सुरेश गरड, हिंदु एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष श्री. नारायणराव कदम, शिराळा येथील श्री. अशोक मस्कर

विशेष

१. गोपूजनाच्या वेळी गायीने गोमूत्र दिले. हा शुभसंकेत मानला जातो.

२. फेरी कापड पेठ येथे आल्यावर प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचे भक्त श्रीराम एजन्सीचे मालक श्री. धनी लोंढे यांनी धर्मध्वजास, तसेच पालखीतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतिमेस हार अर्पण केला. या वेळी त्यांनी केलेला जयघोष उपस्थितांमध्ये भाव जागृत करणारा आणि नवचैतन्य निर्माण करणारा ठरला. मारुति चौक येथे सौ. तेजस्विनी सरनोबत, तसेच डी.पी. परांजपे कोल्ड्रींक हाऊसचे मालक श्री. मनोज सहस्रबुद्धे आणि सौ. सहस्रबुद्धे यांनीही ध्वजास हार अर्पण केला.

३. मिरज येथील ‘ओ.एस्.के.’ मार्शल आर्ट यांच्या कार्यकर्त्यांनी चौकाचौकात लाठी-काठी आणि मार्शल आर्ट यांची प्रात्यक्षिके दाखवली.

४. वाहतूक पोलीस उपस्थित नसतांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमन करून हिंदूंसाठी आदर्श निर्माण केला.

५. दिंडीचे फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले. याचा लाभ ६५ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांनी घेतला.

मान्यवरांचे मार्गदर्शन

हिंदु ही देशाची संस्कृती आहे ! – श्री. नारायणराव कदम, हिंदु एकता आंदोलन, कार्याध्यक्ष

आपण आज हिंदु राष्ट्राचा उद्घोष करत आहोत. यात गैर ते काय ? हिंदु या देशाची संस्कृती असून हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडणे अत्यंत योग्य आहे. हिंदु संस्कृती ही सर्वसमावेशक आहे. येथे अनेक उपासनापद्धती असूनही हिंदू आज एकत्रित आहेत. यामुळे सर्व हिंदू समाजाने ‘हिंदू सारा एक’याच भावनेने मार्गक्रमण केले पाहिजे.

हिंदूंवर अन्याय झाल्यास हिंदु विधीज्ञ परिषद पुढाकार घेईल ! – अधिवक्ता समीर पटवर्धन, सांगली जिल्हा अधिवक्ता परिषद, अध्यक्ष

हिंदूंवर जिथे जिथे अत्याचार होईल, तिथे तिथे मी हिंदु विधीज्ञ परिदषेसाठी नेहमीच पुढाकार घेईल ! हिंदूंच्या साहाय्यासाठी परिषद २४ घंटे साहाय्य करण्यासाठी सिद्ध आहे.

गाय कापणारी काँग्रेस आणि साम्यवादी यांना कायमचे हद्दपार करा ! – श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती, पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक

आज केरळ राज्यात गोमातेच्या हत्या होत आहे. केवळ केंद्र सरकारच्या कायद्याला विरोध म्हणून ही विरोधी कृती केली जात आहे. यापुढील काळात गाय कापणारी काँग्रेस आणि साम्यवादी यांना कायमचे हद्दपार केले पाहिजे !

वैशिष्ट्यपूर्ण पालखी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा ठेवलेली फुलांनी सजवलेली पालखी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रतिमा असलेल्या पालखीचे नागरिकांनीही दर्शन घेतले. पालखी वाहून नेणार्‍यांनी अब्दागिरीचा वेश परिधान केला होता. काही ठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. टाळ घेऊन चालणारे वारकरी, नामघोष करणारे पथकही सहभागी झाले होते. काहींनी गोंधळींची वेशभूषा परिधान केली होती.

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. भिडे (गुरुजी) यांच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी होणे अपेक्षित ! – श्री. सचिन पवार

समाजात आज परात्पर गुरु आठवले आणि पू. भिडे (गुरुजी) हे दोघेही राष्ट्रोद्धारासाठी झटत आहेत. या त्यांच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी होणे अपेक्षित आहे. ४ जून या दिवशी रायगड येथे होणार्‍या सुवर्ण सिंहासन पुनर्प्रस्थापनेच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *