-
युवकांना राष्ट्र-धर्म रक्षणार्थ उद्युक्त करणारी प्रेरणादायी शौर्य जागरण शिबीरे !
-
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियान !
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने होणार्या शौर्य जागरण शिबिरांना समाजातून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची अपरिहार्यता, शौर्य जागरणाचे महत्त्व आणि राष्ट्र-धर्म यांच्या प्रतीच्या कर्तव्याची जाणीव यांमुळे अशी शिबीरे पुन:पुन्हा आयोजित करावी, असा उत्स्फूर्त सूर धर्माभिमान्यांमधून उमटत आहे. हिंदूंमधील हिंदुत्व आणि वीरत्व जागृत होत आहे, हे भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनेच शक्य होत आहे.
कल्याण : येथील अन्नपूर्णा नगर येथे २८ मे या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत शौर्य जागरण शिबीर पार पडले. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महाराणा प्रताप यांच्या जयंतीदिनाचा सुवर्णसंगम होता. हे औचित्य साधून येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ झाला. शिबिरात ५० धर्माभिमानी उपस्थित होते. शेवटी सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली.
येणार्या आपत्काळाला तोंड देण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था
येणारा काळ हा भीषण आपत्काळ असणार आहे. त्याला तोंड देण्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करायला हवे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असलेले हिंदु राष्ट्र हे सहजासहजी येणार नसून त्यासाठी आपल्याला पुष्कळ संघर्ष करावा लागेल. सनातन संस्थेच्या वतीने विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.
क्षणचित्रे
१. लाठीकाठीचे प्रशिक्षण चालू झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील युवक उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी झाले.
२. शिबिरात वयाची साठी गाठलेले आजोबाही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात