मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (झोपु) गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज कॉंग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील घरासह सात ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
बाबा सिद्दिकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर वांद्रे येथील “झोपु’ योजनेत १०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
सिद्दिकी यांच्याबरोबरच बांधकाम व्यावसायिक रफिक मुकबूल कुरेशी यांच्या घरावरही छापा घालण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान कार्यालयांचीही झाडाझडती घेण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. या कथित गैरव्यवहारप्रकरणी बाबा सिद्दिकी, रफिक मुकबूल कुरेशी, नजमुद्दीन मिठी बोरवाला यांच्यासह तीन कंपन्यांविरुद्ध गुन्हा (एन्फोर्समेंट केस इन्फोर्मेशन रिपोर्ट) दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास ईडी करत आहे. गैरव्यवहार झालेल्या योजनेसंबंधी कागदपत्रे मिळवण्यासाठी छापे घालून शोधमोहीम राबवण्यात आली. या छाप्यांमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे “ईडी’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या योजनेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार स्थानिकाने २०१२ मध्ये केली होती. वांद्रे येथील जमात-ए-जमुरिया झोपडपट्टीतील काही रहिवाशांच्या नावाने बनावट शिधापत्रिका बनवून त्या पुराव्याआधारे “झोपु’ योजनेत बांधलेल्या सात इमारतींत घर मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हा १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गैरव्यवहार आहे, असा तक्रारदाराचा दावा आहे. २०१४ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संदर्भ : सकाळ