आग्रा येथे हिंदु राष्ट्र जागृती सभा
आग्रा (उत्तरप्रदेश) : हिंदूंमध्ये संघटन नसल्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत अडचणी येत आहेत. हिंदू संघटित झाल्यास जगातील कोणतीच शक्ती त्यांना हिंदु राष्ट्र स्थापण्यापासून थांबवू शकणार नाही आणि अखंड भारताचे स्वप्नही तेव्हाच साकार होईल. त्यामुळे हिंदूंना जागृत करण्यासाठी अशा धर्मजागृती सभा संपूर्ण भारतभर आयोजित केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन हिंदु युवा वाहिनीचे आग्रा शहराध्यक्ष श्री. तरुण सिंह यांनी केले. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील वैभव पॅलेस हॉटेलमध्ये हिंदु राष्ट्र जागृती सभा घेण्यात आली. या सभेला हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेला हिंदु जनजागृती समितीचे देहली-पंजाब-हरियाणा समन्वयक श्री. सुरेश मुंजाल आणि सनातन संस्थेचे श्री. कार्तिक साळुंके यांनी संबोधित केले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश मुंजाल म्हणाले, ‘‘वर्ष १९४७ च्या आधी भारत हिंदु राष्ट्रच होते. त्या हिंदु राष्ट्राला आज धर्मनिरपेक्ष राष्ट्र संबोधून हिरवा रंग फासला जात आहे. त्यामुळे हिंदूंची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.’’
हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हा हिंदूंचा घटनादत्त अधिकार ! – श्री. कार्तिक साळुंके, सनातन संस्था
‘८० टक्क्यांहून अधिक हिंदूंच्या भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे घटनाविरोधी आहे, चुकीचे आहे’, अशा विचारांची अफवा काही लोक समाजात पसवरत आहेत; मात्र समाज आणि राष्ट्र यांच्या हिताची संकल्पना ठेवणे पूर्णत: घटनेला अनुसरून आहे. कायद्याच्या कक्षेत राहून राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन करण्यासाठी राज्यघटनेने संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्याला विरोध होण्यासाठी कोणतेही कारण नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनादत्त अधिकार आहे.
क्षणचित्रे
१. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या विश्व कल्याणासाठी आरंभ केलेल्या अद्वितीय कार्याविषयी दाखवण्यात आलेला ‘पॉवर पॉईंट प्रझेंटेशन’ पाहून उपस्थित हिंदू प्रभावित झाले.
२. हिंदूंमध्ये धर्मतेज निर्माण करणारे मार्गदर्शन ऐकून हिंदूंनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात