सुनियोजित हिंदू एकता दिंडीने सावंतवाडी शहरात हिंदु राष्ट्र स्थापनेचे नवचैतन्य प्रक्षेपिले !
सावंतवाडी : सनातन धर्माचा प्रसार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना हेच जीवितकार्य असलेले सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत वीरश्री आणि शौर्य जागरण करणारी हिंदू एकता दिंडी सावंतवाडी शहरातून काढण्यात आली. या दिंडीमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचाराने प्रेरित झालेले विविध संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच सनातन प्रभात नियतकालिकाचे वाचक, हितचिंतक, सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आदी ३०० हून अधिक जण सहभागी झाले होते. या वेळी दिलेल्या हिंदु राष्ट्राच्या घोषणांमुळे सावंतवाडी शहर दुमदुमले.
येथील श्री आत्मेश्वर मंदिराच्या नजीक दिंडीला प्रारंभ झाला. प्रारंभी सनातनचे श्री. राजेंद्र परब यांनी शंखनाद केला. त्यानंतर धर्मध्वजाचे पूजन कारिवडे, सावंतवाडी येथील धर्माभिमानी श्री. शरद परब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर फेरीला प्रारंभ होऊन उभा बाजार, गांधी चौक, मिलाग्रीस हायस्कूल, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, श्रीराम वाचनालयामार्गे गवळी तिठा येथे आल्यावर फेरीची सांगता झाली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. शरद राऊळ यांनी सूत्रसंचलन केले. श्री. दैवेश रेडकर यांनी सांगता समयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची ओळख करून दिली.
क्षणचित्रे
१. सावंतवाडी वेदपाठशाळेचे आचार्य श्री. गणेश सांबदीक्षित गुरुजी यांच्या पाठशाळेत परीक्षा चालू आहे. त्यातूनही वेळ काढून परीक्षा संपल्यावर ते लगेच फेरीत सहभागी झाले.
२. फेरी मुख्य बाजारपेठेत आली असता लोक कार्यालयाच्या इमारतींतून, दुकानांत उभे राहून बघत होते.
३. कुडाळ तालुक्यातील कमळेवीर आणि कवठी येथील महिलांनी फेरीमध्ये फुगडी घातली.
४. साधकांनी फेरीमध्ये स्वसंरक्षणाची (लाठीकाठी) प्रात्यक्षिके करून दाखवली.
५. एका पोलीस कर्मचार्याने, तुमचे कार्यक्रम नेहमी सुनियोजित असतात, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात