परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तमिळनाडूतील हिंदुत्वनिष्ठ संघटित !
पूरसवक्कम : तमिळनाडू राज्यातील शिवसेनेच्या वतीने हिंदुत्वनिष्ठांच्या विशेष सभेचे आयोजन करून हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना अभिवादन करण्यात आले. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या नुकत्याच झालेल्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील थाना स्ट्रीट भागात २१ मे या दिवशी झालेल्या या सभेला तमिळनाडू राज्यातील १६ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सुमारे ७५ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी परात्पर गुरु श्री श्री जयंत आठवले यांचे चित्र व्यासपिठावर ठेवण्यात आले होते. शिवसेनेचे श्री. राधाकृष्णजी, श्री. कुमार सिद्धर स्वामी, हिंदु महासभेचे कुमारजी, ख्रिस्ती धर्माचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारलेले कन्याकुमारी येथील श्री. जॉन्सन, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सौ. सुगंधी जयकुमार, काशिनाथ शेट्टी, श्री. श्रवण, श्री. जयकुमार या वेळी उपस्थित होते.
१. परात्पर गुरु श्री श्री जयंत आठवले यांना अभिवादन करून शिवसेनेचे श्री. राधाकृष्णजी यांनी उपस्थितांना संबोधित केले. श्री. राधाकृष्णजी म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राविषयी कुठून उद्घोष होत असेल, तर तो गोवा राज्यातून होत आहे. यासाठी गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) अविश्रांत कार्य करत आहेत. काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांना पाकचे सैनिक ठार करत आहेत. हा प्रकार बंद होण्यासाठी आणि हिंदुस्थानची अस्मिता पुनर्स्थापित होण्यासाठी पाकशी युद्धाशिवाय पर्याय नाही. यासाठी आपण समाजाचे मनोबल वाढवायला हवे.’’
२. श्री. कुमार सिद्धर स्वामी म्हणाले, ‘‘भगवंताच्या आशीवार्दामुळेच आम्ही संघटित झालो आहोत. एकगठ्ठा मतांच्या राजकारणामुळे आणि हिंदूंमध्ये ऐक्याच्या अभावामुळे आपली परिस्थिती वाईट झाली आहे.’’
३. हिंदु महासभेचे कुमारजी म्हणाले, ‘‘गांधीजी आणि नेहरू यांच्यामुळे आपले लोक हिंदूंचा गौरवास्पद इतिहास विसरून गेले आहेत. हिंदूहित लक्षात घेऊन आपण प्रत्येक कृती केली पाहिजे.’’
४. ख्रिस्ती धर्माचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारलेले कन्याकुमारी येथील श्री. जॉन्सन म्हणाले, ‘‘आपला धर्म कसा आहे, याविषयी आपण लोकांना शिक्षण दिले पाहिजे. जेणेकरून त्यांना खरे ज्ञान मिळेल.’’
५. सौ. सुगंधी जयकुमार म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्यासारखे ज्ञानगुरु, मोक्षगुरु, राष्ट्रगुरु आणि धर्मगुरु यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे, हे आमचे भाग्य आहे. अशा गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण आपल्या वाट्याला आलेलेे कर्तव्य पार पाडले पाहिजे. नामजप केला पाहिजे, तसेच राष्ट्र आणि धर्म यांसाठी प्रार्थनेबरोबर स्वत:चे दोष घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.’’
क्षणचित्रे
१. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्र असलेला फलक व्यासपिठावर लावण्यात आला होता.
२. हिंदुत्वाचे कार्य करणार्या ६६ हिंदुत्वनिष्ठांचा या वेळी ‘वीर शिवाजी पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला. या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात छत्रपती शिवाजी, तसेच शिवसेना पक्षप्रमुखांच्या छायाचित्रासह परात्पर गुरु श्री श्री जयंत आठवले यांचे छायाचित्रही अंतर्भूत करण्यात आले होते.
३. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. तमिळनाडूमधील हिंदूंना संघटित करण्यासाठी समिती करत असलेल्या कार्याचे श्री. राधाकृष्णजी यांनी कौतुक केले.
४. कार्यक्रमाच्या प्रारंभी सात्त्विक भजने लावण्यात आली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात