जळगाव : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव आणि महाराणा प्रताप यांची जयंती या शुभयोगांच्या निमित्ताने २९ मे या दिवशी चोपडा येथे हिंदू एकता दिंडी पार पडली. या माध्यमातून ७०० संघटित हिंदूंनी दिलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ललकारीने संपूर्ण परिसर निनादला. मेघुराया चौकात सायंकाळी ६ वाजता धर्माभिमानी श्री. शाम परदेशी यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. या वेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. रवींद्र महाराज यांनी पौरोहित्य, तर अलोक महाराज यांनी शंखनाद केला. राजपूत समाज आणि हिंदु जनजागृती समिती यांनी दिंडीचे आयोजन केले होते. दिंडी मार्गस्थ होतांना चौकाचौकात तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांमधील वीरत्व जागृत केले. फेटे परिधान केलेल्या महिला, तरुणींचे लेझीम पथक यांतून रणरागिणींच्या वीरश्रीचा अविष्कार झाला. त्यामुळे दिंडी पहाणार्यांनी स्वयंस्फूर्तीने घोषणा दिल्या. काही जणांनी दिंडीचे चित्रीकरणही केले. धर्माभिमानी श्री. प्रवीण जैन आणि श्री. शाम परदेशी यांनी गोळ्या आणि पाणी वाटपाचे नियोजन केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधाकर चौधरी यांनीही मार्गदर्शन केले.
सहकार्य : दिंडीसाठी पोलिसांनी तत्परतेने अनुमती दिली, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांवर असलेल्या विश्वासामुळे दिंडीच्या वेळी पोलीस बंदोबस्तही अल्प होता.
मान्यवर : ह.भ.प. प्रसाद महाराज, विश्व हिंदु परिषदेचे श्री. दलाल सर, जैन समाजाचे श्री. प्रवीण जैन, श्री. युवराज राजपूत.
संघटना : महाराणा प्रताप नवयुवक मित्र मंडळ, अलकरी राजपूत समाज मंडळ, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात