मंगळुरू : येथील कोल्या श्री मुकांबिका देवालयामध्ये वेद आणि यज्ञ यांचे महत्त्व या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जन्मभूमी स्वसहाय सौहार्द संघाचे निर्देशक श्री. नारायण, सिंडिकेट बँकेचे निवृत्त व्यवस्थापक श्री. अशोक कुमार, निवृत्त पोलीस अधिकारी श्री. राघव, श्री मुकांबिका देवालयाचे अध्यक्ष श्री. मधुसुदन, कश्यप वेद रिसर्च फाऊंडेशनचे संघटक श्री. दीपक, मुकांबिका देवालयाचे पुरोहित श्री. श्याम भट आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्र मोगेर हे उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करतांना श्री. चंद्र मोगेर म्हणाले की, सध्या जसे वैद्यकीय शास्त्रात अनेक शाखा असल्याने आपण त्याला प्रगती म्हणतो त्याप्रमाणेच हिंदूंच्या संतांनी संशोधनाद्वारे देवतांच्या तत्त्वाचा शोध लावला आहे. यामुळेच हिंदु धर्मात ३३ कोटी देवतांचा उल्लेख आढळतो. हिंदु धर्मामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग असल्याने अनेक धर्मग्रंथ उपलब्ध आहेत. व्यक्तीने त्याच्या प्रकृतीनुसार आणि साधनामार्गाप्रमाणे साधना केल्यास त्याला ईश्वरप्राप्ती होऊ शकते, हेच हिंदु धर्माचे श्रेष्ठत्त्व आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी अग्निहोत्र कसे करावे ?, हे उपस्थितांना दाखवण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात