रशिया : सिरीयातून दहशतवाद्यांनी रशियात येण्याची आम्ही वाट पाहणार नाही, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांना ठणकावले आहे. दहशतवादाशी लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सुमारे ४००० रशियन नागरिक आणि स्वतंत्र देशांच्या राष्ट्रमंडळातील (पूर्वीच्या सोव्हियेत संघराज्यातील सदस्य देश) ४५०० ते ५००० जण सिरीयात दहशतवाद्यांच्या बरोबरीने लढत आहेत, अशी माहिती पुतिन यांनी दिल्याचे स्पुतनिक या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
“त्यांनी आमच्यापर्यंत किंवा तुमच्यापर्यंत यायची वाट पाहायची का ? आम्ही पाहणार नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीवर सहमत व्हायचे असेल तर त्याची चर्चा करा आणि करार करा,” असे ते म्हणाले. सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम या कार्यक्रमात ते बोलत होते.
“कोणावरही शिक्के मारू नका. फक्त चिंता करण्याजोग्या विषयांवर एकत्र काम करूया. आम्ही यासाठी तयार आहोत. आता आम्हाला तुमच्याकडून (पाश्चिमात्य देश) सकारात्मक भूमिका अपेक्षित आहे,” असे ते म्हणाले.
संदर्भ : माझा पेपर