गेल्या १५ दिवसांत अधिवक्ता घोष यांच्यावर झालेल्या आक्रमणाची तिसरी घटना !
बांगलादेशी हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या विरोधात केंद्र शासनाला कृती करावीशी का वाटत नाही ?
ढाका : इस्लामी बांगलादेशमध्ये हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बांगलादेशच्या कानाकोपर्यातून जवळपास प्रतिदिन हिंदूंवर अत्याचार होत असल्याची वृत्ते वाचनात येतात. या अत्याचारांमध्ये पोलीसांचाही सहभाग असल्याचे अनेक वेळा दिसून आले. अशा वेळी धर्मांधांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी लढणारे अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांच्या सहकार्यांवर पोलिसांनीच प्राणघातक आक्रमण केल्याची घटना घडली आहे.
१. चितगांव जिल्ह्यातील निर्भही उपजिल्ह्यात सुमन कुमार डे या हिंदु व्यापार्याचा दगडांशी संबंधित (स्टोन मॅन्युफॅक्चरिंग) व्यवसाय आहे.
२. त्यांना काही दिवसांपूर्वी स्थानिक पोलिसांनी त्रास द्यायला आरंभ केला. त्यांच्याकडून पैसे उकळले आणि मानसिक त्रास दिला.
३. त्रस्त डे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा न्यायालयाकडून पोलीस आणि प्रशासन यांना कडक शब्दांत आदेश देण्यात आला आणि डे यांना त्यांचा व्यवसाय चालवू देण्यात सहकार्य करण्यास सांगण्यात आले.
४. यावर संतप्त झालेल्या पोलिसांनी डे यांना शिव्या देत धमकावले. (हिंदूंनो, बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंची बाजू कोणीही घेत नाही. भारतात कथित असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप करून आकाश-पाताळ एक करणारे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादीही अशा घटनांविषयी गप्प असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
५. यावर बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी लढणार्या बांगलादेश मायनॉरिटी वॉच संघटनेशी डे यांनी संपर्क साधला.
६. संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांच्या सहकार्यांनी बांगलादेशची राजधानी ढाका येथून घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला.
७. हे कळताच चितगांव जिल्ह्यातील हाथाझारी उपजिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक महंमद मोशिदौल्ला रेजा यांनी अधिवक्ता घोष यांना दूरभाषद्वारे धमकावले की, हाथाझारी येथे तुम्ही येऊ नका. नाहीतर तुम्हाला त्रास देण्यात येईल.
८. तरीसुद्धा अधिवक्ता घोष आणि त्यांचे सहकारी २९ जानेवारीला हाथाझारी पोलीस ठाण्यात पोहोचले.
९. तेव्हा पोलीस उपअधीक्षक महंमद मोशिदौल्ला रेजा यांनी त्यांच्यावर आक्रमण केले.
१०. या वेळी अवामी लीग या राजकीय पक्षाच्या अनेक जिहादी कार्यकर्त्यांनी घोष आणि त्यांच्या सहकार्यांना जबर मारहाण केली. तसेच एका सहकार्याला अटकही करण्यात आली.
११. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १५ दिवसांत घोष यांच्यावर हे तिसरे आक्रमण करण्यात आले आहे.
१२. घोष यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्य पोलीस अधिकारी यांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात