नेवासा (जिल्हा नगर) येथील ३०० हून अधिक धर्माभिमानी युवकांनी दिली हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटनाची ललकारी !
नेवासा : युधिष्ठिर, वसिष्ठ ऋषि आणि कर्ण यांच्या गुणांनी युक्त असा युवक हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करू शकतो. यासाठी युवकांनी धर्माचरण करून धर्मरक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाने वर्ष २०२३ मध्ये भारत हिंदु राष्ट्र होणारच आहे; परंतु त्याच्या निर्मितीसाठी धर्माभिमानी युवकांनी कार्यरत होणे आवश्यक आहे. सर्वांनी आपापल्या परीने धर्मकार्यात सहभागी व्हायला हवे. यासमवेत माता-भगिनी यांनी स्वतःच्या मुलांवर आई जिजाऊ यांनी जसे छत्रपती शिवबांवर संस्कार केले होते, तसे संस्कार करण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांनी केले. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात १ जून या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत ते मार्गदर्शन करत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘शौर्यजागरण आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ अन् रणरागिणी शाखेच्या कु. प्रियांका लोणे यांनी ‘स्वसंरक्षणाची आवश्यकता’ याविषयी उपस्थित धर्माभिमान्यांना संबोधित केले.
सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी, तर आभार प्रदर्शन धर्माभिमानी श्री. संतोष पंडुरे यांनी केले.
सहकार्य
१. सभेसाठीचे मंगल कार्यालय भाजप जिल्हाध्यक्ष श्री. नितीन दिनकर यांनी केलेल्या सहकार्यामुळे विनामूल्य मिळाले.
२. संदीप मंडप अँड लाईट डेकोरेशनचे श्री. संदीप शिवाजी वीर यांनी सभेसाठी लागणारी ध्वनीक्षेपक यंत्रणा, दिवे आणि मंडपाचे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले.
३. धर्माभिमानी श्री. राजू उपाध्ये यांनी टेबल आणि आसंद्या (खुर्च्या) विनामूल्य उपलब्ध करून दिल्या.
४. धर्माभिमानी श्री. कैलास चव्हाण यांनी संपूर्ण सभेचे विनामूल्य ध्वनीचित्रीकरण केले.
वैशिष्ट्यपूर्ण
१. सभेचा प्रसार अन् सभेची संपूर्ण सिद्धता धर्मशिक्षण वर्गात येणारे धर्माभिमानी आणि त्यांच्या माध्यमातून जोडलेल्या युवक अन् युवती यांनी उत्स्फूर्तपणे केली.
२. सभेला ब्राह्मणी, सोनई, वडाळा, नेवासा बुद्रुक, प्रवरा संगम आणि देवगड या गावांतून युवक सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात