Menu Close

हिंदुत्वाचा अभिमान म्हणजे हिंदुत्व आणि देशाविषयी पोटतिडीक म्हणजेच राष्ट्रीयत्व ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

३२ मण सिंहासन बसवण्यासाठी विधिवत् संकल्प

छत्रपती शिवाजी महाराजांनी एका विधीसाठी एका उपाध्यायांना बोलावले होते. त्याच उपाध्यायांच्या वंशातील एका उपाध्यायांनी ३२ मण सिंहासनासाठीचा संकल्प सांगितला. त्यांनी संकल्पाचा उद्देश सांगून नंतर वैदिक पद्धतीने संकल्प करण्यात आला. २० सहस्रांहून अधिक धारकर्‍यांनी एकाच वेळी आचमन करून हातातून पाणी सोडून ३२ मण सिंहासन बसवण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी रायगडावर केला ३२ मण सुवर्ण सिंहासन बसवण्याचा संकल्प !

देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवावा कि बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठी ॥

राष्ट्रात अवघ्या निर्मू ॥ शिवसूर्यजाळ ॥

  • अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला भगवा आविष्कार
  • ढोल-ताशा, शंखनाद आणि विविध हिंदुत्वनिष्ठ घोषणांनी वातावरण दुमदुमले

रायगड : ‘हिंदुत्व म्हणजे काय, हे संतांनी विविध श्‍लोकांमध्ये सांगितले आहे. आपली परंपरा, धर्म, रूढी, आदर्श यांच्याविषयी आपल्या प्राणापेक्षाही अतिटोकाचा अभिमान आणि आपल्या देशाविषयी असणारी स्वतःची पोटतिडीक या दोन्हींची संयुक्तिक मानसिक स्थिती म्हणजे राष्ट्रीयत्व होय’, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. किल्ले रायगड येथील होळीच्या माळावर ३२ मण सोन्याचे सिंहासन बसवण्याचा संकल्प ४ जून या दिवशी करण्यात आला. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, ज्येष्ठ इतिहासकार डॉ. पांडुरंग बलकवडे, भारताचार्य प्रा. सु. ग. शेवडे आणि २० सहस्रांहून अधिक धारकरी उपस्थित होते.

४ जून या दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. पहाटे ५ ते ७ या वेळेत धारकर्‍यांपैकी काहींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या विविध पोवाड्यांचे गायन केले. त्यानंतर ‘ध्येयमंत्र’ म्हणून मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. सकाळी ११.३० वाजता ३२ मण सुवर्ण सिंहासन बसवण्याचा संकल्प उपस्थित धारकर्‍यांना सांगण्यात आला. त्यानंतर ‘प्रेरणामंत्र’ घेऊन भगव्या ध्वजाला मानवंदना देण्यात आली.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले,

१. भक्त आणि भगवंत, माता आणि लेकरु, चंद्र आणि सूर्य यांचे अतूट नाते आहे. भगवंताचे आयुष्य जर १ लक्ष ४० सहस्र इतक्या वर्षांचे असेल, तर भक्ताचेही आयुष्य तेवढेच आहे, म्हणजेच भारताचा (हिंदुस्थान) जनप्रवाह इतक्या वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि तितकाच प्राचीन आहे.

२. हिंदूंचे एकत्रीकरण व्हावे, यासाठी मोगलशाही आणि आदिलशाही यांमध्ये शहाजीराजांनी अनेक वर्षे काम केले.

३. आमचे हात असतात; पण रात्री झोपलेल्या आपल्या भावाला मारून त्याची मालमत्ता आपल्या नावावर करावी, यासाठी धडपडत असतात. आपले पाय शत्रूला ठेचून मारण्याऐवजी पळून जाण्यासाठी आपण वापरतो.

४. आपल्यावर ७६ राष्ट्रांनी आतापर्यंत आक्रमणे केली. मोहंमद गझनी ३ वर्षांत १७ वेळा आपल्यावर चालून आला, तरी भारतातील छोट्या-मोठ्या राजांनी त्यावर आक्रमण करून त्याला ठार मारू शकले नाही.

५. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे पंतप्रधानपदाचे दावेदार असतांना पाकिस्तानात गेले. पाकिस्तान देशाचा प्रबळ शत्रू असतांना त्या विरोधात आपल्या मनात चीड नाही कि राग नाही, अशी हिंदूंची मनःस्थिती झाली आहे.

६. २२ वर्षांची मुले आज सीमेच्या ठिकाणी छातीवर गोळ्या खाऊन मरत आहेत. ‘दया तिचे नाव तिथे भूतांचे पालन । आणिक निर्दालन कंटकांचे ॥’, असे संत एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणेच ‘सापाला मारणे, हीच त्यावर दाखवलेली भूतदया’ होय.

‘शिवाजी’ नावानेच अंगात शक्ती आणि सामर्थ्य संचारते ! – श्री. रावसाहेब देसाई

‘सुवर्ण सिंहासन व्हावे’, हे प्रत्येकाच्याच मनात आहे; म्हणून आज सर्व धारकरी येथे उपस्थित आहेत. ‘शिवाजी’ या तीन अक्षरांमध्ये एवढी शक्ती आहे की, त्यांचे नाव घेतले की, आपल्या अंगात शक्ती आणि सामर्थ्य संचारते. ती किमया आपण सिंहासनाच्या माध्यमातून संकल्प करून करणार आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत आणि आपण त्यांचा आदर्श ठेवून वागायलाच हवे.

स्वातंत्र्यासाठी मराठ्यांनी केलेला संघर्ष सर्वात अद्वितीय ! – डॉ. पांडुरंग बलकवडे

छत्रपती शिवरायांच्या पश्‍चात औरंगजेब ६० लक्ष सैन्याची फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला ९ वर्षांचा संघर्ष, त्यांचे बलिदान संपूर्ण मराठी माणसाला आजही प्रेरणादायी आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी ११ वर्षे संघर्ष केला आणि त्यांचे अवघ्या १९ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर महाराणी ताराबाई यांनी हातात समशेर घेऊन ७ वर्षे संघर्ष केला. त्यानंतर मात्र औरंगजेब हताश होऊन मृत्यू पावला. जगाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यासाठी मराठ्यांनी केलेला हा संघर्ष सर्वात अद्वितीय आहे. या वेळी डॉ. बलकवडे यांनी इतिहासातील अनेक संदर्भ विशद करून मराठ्यांनी देहलीपर्यंत जाऊन कसा पराक्रम गाजवला, याविषयीही सर्व धारकर्‍यांना अवगत करून दिले.

जोपर्यंत प्रभु रामचंद्रांचे स्मरण आहे, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण रहाणार ! – भारताचार्य प्रा. सु. ग. शेवडे

१. मुसलमानी काळामध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले. ही परिस्थिती ४०० वर्षे होती; पण ५ पातशाह्यांना नमवून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आणले. असा हा स्वर्णीम इतिहास देशातील नव्या लोकांना नव्या पिढीला घडवण्यासाठी पुष्कळ उपयुक्त आहे. जोपर्यंत प्रभु रामचंद्रांचे स्मरण आहे, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण रहाणार आहे.

२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही हेच सांगितले की, आम्हाला पराभवाचाच इतिहास शिकवला गेला. पराक्रमाचा इतिहास शिकवलाच गेला नाही.

३. आमचा धर्म सनातन वैदिक ईश्‍वरी धर्म आहे आणि बाकी सर्व पंथ आहेत. कारण धर्म हा ईश्‍वरनिर्मित, तर पंथ हा मनुष्यनिर्मित असतो.

४. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की, ज्याला आपली उन्नती किंवा अवनती करण्याची एक संधी असते. तरीही माणसे आपापल्यात प्राण्यांसारखे दुष्ट व्यवहार करतात. ८४ लक्ष योनीतून आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. यावर मात्र तथाकथित पुरोगामी आणि स्वतःला शहाणे समजणारे लोक प्रतिप्रश्‍न करतात.

५. जन्माचे सार्थक कसे करायचे, हे शिकवणारा हिंदु धर्म आहे. जन्माचे सार्थक व्हावे, म्हणून राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करून दाखवायला हवे आणि आपला आदर्श निर्माण करायला हवा.

क्षणचित्रे

१. संकल्पाला उपस्थित रहाता यावे, यासाठी ३ जून या दिवशी मध्यरात्रीपर्यंत राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले धारकरी गड चढून कार्यक्रम स्थळी पोहोचले होते. त्यानंतरही धारकर्‍यांचा उत्साह हा आवेशपूर्ण होता.

२. सर्वांनी भगवे फेटे परिधान केल्यामुळे संपूर्ण रायगड भगवा झाल्याचे दिसत होते.

३. गडावर ढोल-ताशांचा गजर, शंखनाद आणि धारकर्‍यांनी दिलेल्या विविध स्फूर्तीदायी घोषणा यांमुळे तेथील वातावरण उत्स्फूर्त आणि शिवकालीन झाले होते.

४. संकल्प सोहळ्याचे ‘ड्रोन’च्या साहाय्याने संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले.

५. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गडावर मोठ्या संख्येने पोलीस, तसेच केंद्रीय पोलीस दलाचे सैनिकही तैनात करण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *