पुणे : चोरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी पोलिसांवर असते, मात्र पुण्यात पोलिसच चोर निघाल्याने कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विमानतळ परिसरात डिझेलची पाईपलाईन तोडून त्यातून तीन लाख रूपयांचे डिझेल चोरीला गेल्याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकासह पाच जणांना दरोडा प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक निरीक्षक रवींद्र भिडे (पुणे शहर), उपनिरीक्षक ठोंबरे (पुणे ग्रामीण), पोलीस कर्मचारी शिवशरण, इस्माईल शेख, दिनेश पवार आणि मोतीराम पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी लोहगाव येथील तालेरा फार्म हाऊस येथे रात्री मुबंई वरून लोणीला जाणारी डिझेलची पाईपलाईन लाईन लिकेज झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाईपलाईन लिकेज करून त्याद्वारे ३ लाख रुपयांचे पाच हजार लिटर डिझेल चोरीला गेले होते.
गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु ठेवला होता. त्यात पोलिसांचाच सहभाग असल्याचे समोर आल्याने सर्वजन चक्राऊन गेले. या सहा जणांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.
संदर्भ : सामना