मंडला (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेकडून जिल्हाधिकार्यांना निवेदन !
मंडला (मध्यप्रदेश) : केरळ येथे उघडपणे होणार्या गोहत्या तसेच गोमांस भक्षण यांवर बंदी घालण्याविषयी हिंदु सेवा परिषदेने मंडलाच्या जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कृषी क्षेत्रात गोवंशाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोवंशाविना भारतीय शेतीची कल्पनाही करू शकत नाहीत. गोवंशाच्या घटणार्या संख्येचा दुष्परिणाम कृषी क्षेत्राच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेवर होत असल्याने गोवंश हत्या बंदी कायदा लागू करून संपूर्ण राष्ट्रामध्ये त्याचे काटेकोरपणे पालन केले जावे. यासह गोहत्येमध्ये सहभागी असणार्या प्रत्येक व्यक्तीला त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, हिंदूंच्या राष्ट्रीय आणि धार्मिक भावना दुखावणारे कार्य करणार्या एन्.एस्.यू.आय. या संघटनेवर बंदी घालण्यात यावी, या मागण्याही केल्या आहेत.
केंद्र सरकारकडून गोवंशाच्या संरक्षणासाठी केलेल्या नियमांचे उल्लंघन एन्.एस्.यू.आय. सारख्या संघटनांकडून केले जात असले, तरी सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम रहावे. चेन्नई येथे आय.आय.टी.च्या विद्यार्थ्यांकडून आयोजित गोमांस मेजवानीमध्ये केल्या गेलेल्या गोमांस भक्षणालाही हिंदु सेवा परिषदेने विरोध केला आहे. निवेदनामध्ये केलेल्या मागण्यांच्यासंदर्भात लवकरात लवकर कायदा बनवून गोमातेला राष्ट्रीय माता घोषित करावे अन्यथा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्याची चेतावणीही दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात