जनतेकडून वसूलणा-या दंडाच्या पैशाच्या उपयोग स्वत:च्या सुखसोर्इसाठी करणा-या अशा पोलिसांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी जनतेची अपेक्षा आहे – संपादक, हिंदुजागृति
मुंबई : मोटर सायकल रायडरकडून महिन्याला सहा हजार रुपये… इन्चार्ज राहण्याकरता दोन लाख रुपये… रात्रपाळीस दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्यांकडून महिन्याला पाच हजार रुपये… वरिष्ठांना खूश करण्यासाठी दरमहा महागड्या कंपनीची दारूची बाटली… हे दरपत्रक आहे माटुंगा येथील वाहतूक पोलिस चौकीचे आणि ते चव्हाट्यावर आणले आहे वरिष्ठांच्या पिळवणुकीला कंटाळलेल्या या चौकीतील एका अंमलदारासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी. या सर्वांनी वरिष्ठांच्या हप्तावसुलीची लेखी तक्रार मुख्यमंत्री आणि पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
हप्तावसुलीसाठी होणाऱ्या पिळवणुकीबाबत माटुंग्यातील वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला आहे. माटुंगा पोलिस चौकीतील इन्चार्ज होळ आणि मदतनीस नांगरे हे वेळोवेळी हप्तावसुली करण्यासाठी दबाव टाकत असल्याची लेखी तक्रार अंमलदार मारुती गोसावी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी केली आहे. पैसे देण्यावरून वादावादी झाल्यास ‘तुम्हाला काय करायचे ते करा, आमचे कोणी काही बिघडवू शकत नाही’, अशी भाषा होळ व नांगरे वापरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अंमलदार मारुती गोसावी यांच्या या तक्रारीनुसार, चौकीतील प्रत्येक पोलिस अंमलदाराकडून मोटरसायकल रायडर, क्रेन ड्युटी, पॉइंट ड्युटी, ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाई केल्यानंतर महिन्याला सहा ते सात हजार रुपये होळ व नांगरे या दोघांना द्यावे लागतात. विविध कारवाईसंदर्भात या दोघांचेही दरपत्रक ठरलेले आहे. त्याचबरोबर वरिष्ठांना खूश ठेवण्यासाठी दारूची बाटली द्यावी लागत असल्याचे सांगत, पोलिस कर्मचाऱ्यांकडून महागड्या दारूचेही पैसे हे दोघे उकळत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या दोघांना पैसे पुरवल्यास हवे त्या ठिकाणी ड्युटी मिळते. या पत्रात तक्रारदारांमध्ये वाहतूक विभागातील सहआयुक्तांच्या रिडरपासून तळागाळातील कर्मचाऱ्यांचीही नावे नमूद करण्यात आली आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेत वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीत तक्रारदार मारुती गोसावी या नावाची कुणीही व्यक्ती माटुंगा चौकीत नसल्याचे पुढे आले. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चौकीतीलच कुणीतरी खोट्या नावाने ही तक्रार केल्याचे कळते. या घटनेची गंभीर दखल पोलिस आयुक्तांनी घेतली असून वाहतूक पोलिस उपायुक्तांना चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिली.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स