न्यामती (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा
न्यामती (कर्नाटक) : धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हिंदु धर्माचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती यांचे रक्षण करण्यास सक्षम आहे. हिंदूंना स्वाभिमानाने जीवन जगता यावे, यासाठी सर्व हिंदूंनी संघटितपणे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय रेवणकर यांनी केले. न्यामती येथील श्री महंतेश्वर वीरशिव कल्याण मंदिर येथे आयोजित हिंदु धर्मजागृती सभेमध्ये ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. कावेरी रायकर आणि रणरागिणी शाखेच्या कु. रेवती मोगेर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या सभेला ४०० धर्माभिमानी उपस्थित होते.
सभेला संबोधित करतांना सनातन संस्थेच्या सौ. कावेरी रायकर म्हणाल्या की, सध्या समाज धर्मनिरपेक्ष बनत आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे धर्माचरणापासून दूर गेलेल्या समाजाची व्यवस्था पालटण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे. ‘सध्याच्या वाढत्या असुरक्षिततेमध्ये स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे’, असे रणरागिणी शाखेच्या कु. रेवती मोगेर यांनी म्हटले.
क्षणचित्र
या सभेमध्ये माजी आमदार एम्.पी. रेणुकाचार्यजी हेही उपस्थित होते, तसेच धर्मजागृती सभेच्या दिवशी भारत-पाक क्रिकेटचा सामना असतांनाही धर्माभिमानी सभेला उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात