पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचे संपूर्ण जगभरात जवळपास मान्य झाले आहे. याबाबतीत त्या देशाचा खोटेपणा वारंवार उघडा पडला आहे. याचाच नमुना पाकिस्तानच्या अमेरिकेतील राजदूतांना पाहायला मिळाला.
आमच्या देशात दहशतवाद्यांना आश्रय देत नाही, असे वक्तव्य पाकिस्तानी राजदूत ऐजाझ अहमद चौधरी यांनी केले होते. त्यावेळी उपस्थितांनी उपरोधिक हसून त्याची खिल्ली उडवली. अमेरिकेतील एका बुद्धिवंतांच्या गटात (थिंक टँक) बोलण्यास गेलेले असताना चौधरी यांचे हे हसे झाले. अटलांटिक काऊन्सिल या संघटनेच्या साऊथ एशिया सेंटरमध्ये ते बोलत होते.
तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर याच्या मृत्यूबद्दल चौधरी बोलत होते. मुल्ला ओमरने अफगाणिस्तान सोडलेले नव्हते, असे चौधरी म्हणाले. वास्तविक मुल्ला ओमर हा कराचीतील एका इस्पितळात २०१३ साली मरण पावला होता, हे सर्वविदीत आहे. तसेच ओसामा बिन लादेन हाही पाकिस्तानातच मारला गेला होता.
मात्र पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत नाही, हे चौधरी वारंवार सांगत राहिले आणि त्यांच्या समोर बसलेले सर्व जण हसत होते. शेवटी वैतागून त्यांनी ‘यात एवढे हसण्यासारखे काय आहे’ असे उपस्थितांना विचारले, असे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे. यावेळी अनेकांनी चौधरी यांना टोकले आणि पाकिस्तान हाच तालिबानचा पोशिंदा असल्याचे म्हटले.
संदर्भ : माझा पेपर