राऊरकेला : सर्व क्षेत्रात खाजगीकरण होत असतांना मठ-मंदिरांचे सरकारीकरण करण्यामागे शासनाचा काय हेतू आहे ? हे लक्षात घेऊन मठ-मंदिरांच्या रक्षणासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी जगतसिंगपूर जिल्ह्यातील खोरत येथील अखंडमणिमंडलेश्वर मंदिरात २९ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या संतसंमेलनात केले. या संतसंमेलनात सुमारे ४० पेक्षा अधिक संत-महंत उपस्थित होते.
श्री. शिंदे पुढे म्हणाले, “आज शासन मठ-मंदिरात श्रद्धाळू हिंदूंच्या अर्पणातून गोळा होणाऱ्या धनावर तसेच मंदिराच्या मालमत्तेवर डोळा ठेवून आहे. अनेक प्रसिद्ध मंदिरे कह्यात घेऊन या मंदिरात अर्पण केलेल्या धनाचा अपवापर शासन करत आहे. तसेच मंदिरातील चालीरीतींमध्ये ढवळाढवळ करत आहे. ख्रिस्त्यांचे चर्च आणि मुसलमानांच्या मशिदी यात मात्र शासन कसलाही हस्तक्षेप करत नाही, ही गंभीर गोष्ट आहे.”
शासन ओडिशा राज्यातील मठ आणि आश्रमाविषयी करत असलेल्या अन्यायाविषयी गोठद येथील ओडिशा साधु-संत समाजाचे सभापती महंत चिंतामणी पर्वत महाराज यांनी तीव्र खंत व्यक्त केली. ते म्हणाले “पुरी येथील अनेक मठ, आश्रम आदी शासनाने कह्यात घेतले आहेत; मात्र तेथे रहाणाऱ्या संन्यासींचे दायित्व शासन घेत नाही. आम्ही लहानपणापासून आश्रमात आहोत आणि आश्रमानेच आम्हाला लहानाचे मोठे केले. आम्ही संपूर्ण आयुष्य आश्रमासाठी वाहून धर्माचा प्रसार केला, आश्रमाचा विस्तार केला आणि आश्रम टिकवून ठेवला. असे असतांना आजारी पडल्यानंतर ‘तुमच्या औषधपाण्याचा खर्च तुम्ही करा’, असे शासन सांगते. एकीकडे शासन आश्रमातील धनावर अधिकार सांगते, तर दुसरीकडे इतके वर्षे ज्यांनी आश्रम संभाळला त्यांना वाऱ्यावर सोडतेे.”
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात