अकोला आणि नंदुरबार : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे १४ ते १७ जून या कालावधीत होणार्या सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशना निमित्त अकोला आणि नंदुरबार येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
अकोला येथील सेंटर प्लाझामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, सनातनच्या सौ. प्रतिभा जडी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. पप्पू मोरवाल आणि अधिवक्ता श्री. मधुसुदन शर्मा उपस्थित होते. श्री. श्रीकांत पिसोळकर पत्रकारांना आवाहन करतांना म्हणाले, हिंदु राष्ट्र स्थापनेची आगामी दिशा निश्चित करण्यासाठी २१ राज्यांतील संघटना या अधिवेशात एकत्र येत आहेत. हिंदु संघटनांनी पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्र्राचा उद्घोष या अधिवेशाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे. तरी सर्व दैनिकांनी या अधिवेशाच्या वृत्तांना अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी.
नंदुरबार येथील पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांना सांगितले, मागील ५ राष्ट्रीय अधिवेशनांत निश्चित झाल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातही प्रांतीय अधिवेशन घेण्यात आले होते. या माध्यमातून २०१५ ला पशूवधगृह बंदीसाठी आंदोलन करण्यात आले ते यशस्वी झाले. त्याचसोबत गुजरात-मध्यप्रदेश या मार्गावरील गो-तस्करी रोखण्यात यश आले. नंदुरबारमध्ये गणेशोत्सव मंडळांचे संघटन केल्यामुळे मंडळांच्या समस्यांचे निवारण होऊन प्रशासनाकडून मंडळांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यात आल्या.
या कालावधीत स्थानिक संघटनांचे संघटन करण्यासाठी प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या सहाव्या अधिवेशनाद्वारे होईल. या अधिवेशनात येथून प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. जितेंद्र राजपूत आणि अन्य मान्यवर सहभागी होतील.
हिंदु संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सामायिक कृती आराखड्यांतर्गत वर्षभरातील उपक्रम आणि आंदोलनांची दिशा निश्चित करणार आहेत.
या पत्रकार परिषदेस शिवहिंदुस्थान प्रतिष्ठानचे श्री. नरेंद्र तांबोळी आणि सनातनच्या भावना कदम उपस्थित होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात