रामनाथी (गोवा) : गेल्या पाच वर्षांच्या यशस्वी आयोजनानंतर बुधवार, १४ जूनपासून रामनाथी येथे ‘सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ प्रारंभ होत आहे. केवळ देश पातळीवरील नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धीमाध्यमांनी ज्याची दखल घेतली, अशा या अधिवेशनात भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथून १५० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. १३ जूनपासूनच अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींंचे गोवा येथे आगमन होण्यास प्रारंभ झाला आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होत असलेल्या या अधिवेशनात मुख्यत्वेकरून काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्याबंदी, श्रीराम मंदिराची पुनर्स्थापना, विविध ठिकाणी हिंदूंवर होणारी आक्रमणे, आदी विषयांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. अधिवेशनाच्या काळात महत्त्वपूर्ण अशा विषयांवर चर्चासत्रांद्वारे विचारमंथन होऊन हिंदूंचे व्यापक संघटनासाठी प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत.
हे अधिवेशन जेथे होत असलेल्या श्री रामनाथ मंदिरातील विद्याधिराज सभागृहात अधिवेशनाची सिद्धता पूर्ण झाली आहे. या अधिवेशनासाठी छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथील सनातन धर्म प्रचार सेवा समितीच्या प.पू. साध्वी सरस्वतीजी; उत्तरप्रदेश येथील हिंदु स्वाभिमान मठाच्या राष्ट्रीय अध्यक्षा यति मां चेतनानंद सरस्वतीजी; ओडीशा येथील भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर; झारखंड येथील ‘तरुण हिंदू’ संघटनेचे संस्थापक डॉ. नील माधवदास, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
रामनाथी येथील सनातन आश्रमात हिंदुत्वनिष्ठांनी अनुभवलेे हिंदु राष्ट्र !
हिंदू अधिवेशनासाठी आलेल्या काही हिंदुत्वनिष्ठांनी भूलोकातील वैकुंठ असे ज्याचे वर्णन करण्यात येते आणि चैतन्याचे केंद्र असणार्या सनातन आश्रमाला भेट दिली. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य जाणून घेतले. आश्रम पाहून अनेकांनी ‘हिंदु राष्ट्र कसे असेल’, हे अनुभवता आले’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक आणि धर्माभिमानी हिंदू यांना आवाहन
‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चे थेट प्रक्षेपण आपल्या फेसबूक खात्यावरून शेअर करून धर्मकार्यात सहभागी व्हा !
हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी गोव्यात या वर्षीही १४ ते १७ जून २०१७ या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे ‘सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथील १५० हून अधिक हिंदु संघटनांचे ४०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.
या अधिवेशनाचा लाभ अधिकाधिक हिंदूंना व्हावा, यासाठी या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीच्या www.facebook.com/HinduAdhiveshan
या फेसबूक पानावरून प्रसारित करण्यात येणार आहे. तरी सनातन प्रभातचे वाचक, हितचिंतक आणि धर्माभिमानी हिंदू यांनी हे प्रक्षेपण त्यांच्या फेसबूक खात्यावरून शेअर करावे आणि राष्ट्र-धर्मकार्यात सहभागी व्हावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात