१४ जून या दिवशीच्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सकाळच्या सत्रात मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून माध्यमांतून उलटसुलट बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. डाव्या विचारसरणीचा पगडा असलेल्या माध्यमांद्वारे आता हिंदु जनजागृती समितीचा उल्लेख करतांना प्रत्येक वेळी ‘एक विद्वेषी संघटना’, असा केला जात आहे. तसेच या कालावधीत माध्यमांतून ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची तुमची ‘ब्लू प्रिंट’ काय आहे ?’, ‘हिंदु राष्ट्रात मुसलमानांचे काय करणार ?’, असे प्रश्न उपस्थित करून हिंदु राष्ट्राविषयी नकारात्मकता पसरवण्याचे षड्यंत्र चालू आहे. या सार्या प्रश्नांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत खणखणीत प्रत्त्युत्तर दिले.
‘हिंदु राष्ट्र स्थापनेची भूमिका’ या विषयावर बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे म्हणाले की . . .
१. लोकशाहीच्या गेल्या ७० वर्षांच्या कालावधीत डाव्या विचारसरणीचे लोक हे विसरले आहेत की, ब्रिटीश आणि मोगल भारतात येण्यापूर्वी भारत हे एक समर्थ हिंदु राष्ट्रच होते.
२. त्या वेळी जगातील निराश्रित पारसी, ज्यू, इराणी लोकांना आश्रय देणारा केवळ भारतच होता.
३. आता आपला विकासदर ६ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर गेला, तरी आनंद व्यक्त केला जातो; मात्र विदेशी अभ्यासक अँगर्स मेडिसनने लिहिले आहे की, त्या वेळी भारताचा विकासदर ३४ टक्के होता.
४. हिंदु राष्ट्राची ब्लू प्रिंट आता नव्याने बनवण्याची आवश्यकताच काय ? मोगल आक्रमक येण्यापूर्वी या हिंदुस्थानात धर्मशास्त्र, राजनीती, कौटिल्याचे अर्थशास्त्र होते, स्थापत्यशास्त्र, नृत्यशास्त्र आदी सर्वकाही समृद्ध होते. या देशावर इंग्रजांनी लादलेले फसवे लोकराज्य हटवण्यासाठी मात्र आम्ही ‘ब्लू प्रिंट’ बनवत आहोत.
५. ज्याप्रमाणे रामायण घडण्यापूर्वीच वाल्मीकि ऋषींनी ते लिहून ठेवले होते, त्याचप्रमाणे द्रष्टे संत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९८ मध्येच ‘भारतात २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येईल’, असे लिहिले आहे. त्यासाठी आता जनमानस सिद्ध होत असल्याचे देशातील घटनांवरून स्पष्ट झाले असून आता या अधिवेशनातील हिंदू हा विषय जनमानसात रूजवतील.
६. हिंदु राष्ट्रात कुणाचेही लांगूलचालन नसेल, तर सर्वांना समानाधिकार असेल.
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या विरोधातील अपप्रचाराची रमेश शिंदे यांनी केली चिरफाड !
१. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाविषयीचे वृत्तसंकलन करतांना काही वृत्तपत्रांनी हिंदु जनजागृती समितीचा ‘एक विद्वेषी उजवी संघटना’ असा उल्लेख केला. वास्तविक हिंदु जनजागृती समितीचे कार्य देशभरात सर्वत्र जोमाने चालू आहे. त्यांना मला सांगायचे आहे, ‘हम ना ‘लेफ्ट’ है, ना ‘राईट’ है, हम ‘करेक्ट’ है ।’ आम्ही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या योग्य मार्गानेच चाललो आहोत.
२. काही हिंदूद्वेषी लोकांनी ‘या अधिवेशनावर बंदी यावी’, यासाठी लघुसंदेश मोहीम चालवली. या देशाच्या ‘बरबादी’च्या घोषणा देणारे अशा लोकांना चालतात; मात्र संवैधानिक मार्गाने आम्ही केलेली हिंदु राष्ट्राची मागणी का चालत नाही ?