श्री विद्याधिराज सभागृह (गोवा) : पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे प्रस्तावनात्मक विवेचन केले. ‘धर्माधारित हिंदु राष्ट्राची संकल्पना आणि अधिवेशनाची दिशा’ या संदर्भात मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, गेले चार दिवस देशात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी होत असलेली चर्चा ही गेल्या ५ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांची फलनिष्पत्तीच आहे. उत्तरप्रदेशात हिंदु जनतेला मायावती आणि ओवैसी यांनी ‘हिंदु राष्ट्र कसे स्थापन करता ?’, असे आवाहन केले आणि जनतेने हिंदु राष्ट्राचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणून योगी आदित्यनाथ यांना बहुमताने निवडून दिले. त्यामुळे आता देशामध्ये हिंदु राष्ट्राचे समर्थक आणि विरोधक असे ध्रुवीकरण होत आहे; मात्र ते ध्रुवीकरण हे धर्म विरुद्ध अधर्म असेच आहे ! याचा लाभ करून घेत आपल्याला हिंदु राष्ट्रासाठी जनमानस सिद्ध करायचे आहे. देशातील ८० टक्के हिंदूंनी एकमताने ‘भारत हिंदु राष्ट्र व्हावे’, अशी लोकप्रतिनिधींकडे मागणी करून संवैधानिक पद्धतीने हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. जे लोकप्रतिनिधी ते मान्य करणार नाहीत, त्यांना लोकशाहीतील बहुमताचा आदर नाही, असेच म्हणावे लागेल ! निधर्मीवाद, लांगूलचालन आदी माध्यमांतून लोकराज्याच्या आडून चालू असलेले हिंदूहिताचे हनन करण्याचे राजकीय षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !’