गोरक्षण होण्यासाठी सक्षम कायदा असणे आवश्यक आहे. कायदा केल्याशिवाय गोरक्षण होण्याची शक्यता अल्प आहे, हे आपण जाणले पाहिजे. आज कायदा नसल्याने पोलीस-प्रशासन गोरक्षकांचे ऐकत नाही. कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीतून गोमातेच्या कृपेने वाचल्याचा अनुभव मी घेतला आहे. गोरक्षण करतांना कसायांनी केलेल्या अनेक प्राणघातक आक्रमणांतून गोमातेच्या कृपेने मी वाचलो आहे. ओडिशामध्ये ५ सहस्रहून अधिक गायींना आम्ही हत्या होण्यापासून वाचवले आहे. याचसमेवत गोशाळा चालवून त्यांचे संवर्धन केले आहे, असे मार्गदर्शन अधिवक्ता सुरेशचंद्र पंडा यांनी केले. ते गोवा येथे आयोजित सहाव्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या सायंकाळच्या सत्रात बोलत होते.
अधिवक्ता सुरेशचंद्र पंडा पुढे म्हणाले, ‘‘गोरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहेच. जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत गोरक्षणाचे कार्य आम्हाला करायचेच आहे; मात्र गोरक्षणाचे कार्य खर्या अर्थाने पूर्णत्वास जाण्यासाठी कायदेशीर पद्धतीने गोरक्षण होणे आवश्यक आहे. यासाठी गोरक्षणाचा कायदा हवा. आमची बाजू सत्याची बाजू आहे. देवाच्या, गोमातेच्या आशीर्वादाने आम्हाला सनदशीर मार्गाने गोरक्षण करायचे आहे.’’