श्री विद्याधिराज सभागृह (गोवा) : ‘सर्व समस्यांचे मूळ गाय हेच आहे’, असे चुकीचे चित्र प्रसिद्धीमाध्यमांनी समाजासमोर आज उभे केले आहे. ‘गाय, गोरक्षक आणि पोलीस यांची क्रूरतेने हत्या करणार्या कसायांवर बंदी घाला’, अशी याचिका दाखल केली जात नाही, तर ‘प्राण धोक्यात घालून गायींचे रक्षण करणार्या गोरक्षकांवर बंदी घाला’, अशी याचिका दाखल करण्यात येते, यापेक्षा दुर्दैव ते काय ? गोरक्षण करणारे काही सर्वसामान्य नागरिक असतात, मग प्रत्येक नागरिकावर बंदी घालणार का ?, असा परखड प्रश्न मुंबई येथील पीपल फॉर अॅनिमलचे कार्यकर्ते श्री. चेतन शर्मा यांनी उपस्थित केला. गोरक्षणाच्या संदर्भात केलेल्या साहसी कार्याविषयी ते बोलत होते.
या वेळी श्री. चेतन शर्मा म्हणाले . . .
१. पशूवधगृहांत वृद्ध बैलांना मारण्याच्या नावाखाली भारतात आज अनेक ठिकाणी चांगल्या गायींची हत्या केली जाते. अनेक ठिकाणी गायीच्या वासरांची हत्या करण्यात येते, ही वस्तुस्थिती आहे.
२. आज अशी स्थिती आहे की, गोरक्षण करतांना गोरक्षकांना त्यांचे प्राण गमवावे लागतात. असे प्रसंग माझ्यावरही आले आहेत. एका ठिकाणी एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याला कसायांनी बंदी करून पशूवधगृहातच त्याची हत्या केली. याची बातमी काही स्थानिक वृत्तपत्रे सोडून अन्य कुठेच प्रसिद्ध झाली नाही. ‘गोरक्षण’ हा विषय प्रसिद्धीमाध्यमांनी अत्यंत अयोग्य प्रकारे लोकांसमोर आणला आहे. याउलट स्वत:च्या प्राणांची पर्वा न गोरक्षण करणार्या सामान्य नागरिकांवर बंदी घालण्याची मागणी तेहसीन पुनावालासारखे काही लोक करतात.
३. बांगलादेशात होणार्या गायींच्या तस्करीसमवेत त्या माध्यमातून आतंकवादी कारवायांसाठी आतंकवाद्यांना पैसा पाठवणे आणि भारतात खोटे चलन पाठवणे असे प्रकार घडत असतात. त्यामुळे अवैध गोतस्करीवर प्रतिबंध लावला गेला पाहिजे.
४. शास्त्रज्ञांच्या मते, गायीचे शेण हे कोहिनूर हिर्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे; कारण पृथ्वीवरील भूमीवर गायीचे शेण न पडल्यास भूमी नापिक होऊ शकते.
५. गोहत्या हे जागतिक तापमानवाढीचेही एक कारण आहे. देशात एकीकडे गोवंशाची मोठ्या प्रमाणात हत्या केली जाते, तर दुसरीकडे दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातोे. अशाने समतोल कसा साधला जाईल ?
या सत्रात श्री. चेतन शर्मा यांनी केलेल्या गोरक्षेच्या कार्याचे चलचित्र दाखवण्यात आले.