श्री लक्ष्मीनारायण सभागृह, रामनाथी, गोवा : ‘हिंदु धर्माचे वैचारिक आक्रमणांपासून रक्षण’ या उद्बोधन सत्रात हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता वैद्य श्री. उदय धुरी म्हणाले की, प्रारंभी समितीच्या वतीने केवळ हिंदु सणांच्या संदर्भातील शास्त्र जाणून घेण्यासाठी १-२ प्रवक्ते दूरचित्रवाहिन्यांवर जात असत; मात्र नंतर धर्मावरील प्रत्येक आघाताच्या विरुद्ध बोलण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार प्रवक्त्यांची एक फळी निर्माण झाली. त्यांची २ प्रशिक्षण शिबिरे झाली. त्यातून सिद्ध झालेल्या ४० प्रवक्त्यांनी १०० हून अधिक कार्यक्रमात हिंदूंचे प्रतिनिधीत्व केले आहे. यामुळे प्रवक्त्यांची वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, निवेदक यांच्याशी जवळीक झाली. प्रवक्त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे वृत्तवाहिन्यांमध्ये समितीविषयी एक आदराचे स्थान निर्माण झाले. त्याचसमवेत हे कार्यक्रम पहाणार्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी जवळीक वाढून त्याचा लाभ म्हणून जनआंदोलन शासनापर्यंत पोहोचण्यासाठी साहाय्य झाले. प्रवक्त्यांचा अभ्यास पाहून काही व्याख्यानमालांमध्ये हिंदुविरोधी पंथियांच्या खंडणासाठी त्याचा लाभ झाला. त्यामुळे प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनेतील कार्यकर्त्यांनी धर्मरक्षणासाठी हिंदु धर्माचा प्रवक्ता बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.