श्री लक्ष्मीनारायण सभागृह, रामनाथी, गोवा : ‘हिंदु धर्माचे वैचारिक आक्रमणांपासून रक्षण’ या उद्बोधन सत्रात ओडिशा येथील ‘भारत रक्षा मंच’चे महासचिव आणि भाजपचे ओडिशा येथील प्रवक्ता श्री. अनिल धीर म्हणाले की, दीड मासापूर्वी देशातील ४६ ज्येष्ठ इतिहासतज्ञांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे काही माहिती देऊन महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. या तज्ञांनी म्हटले आहे की, भारताच्या स्वाभाविक संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी श्री. मोदींनी पावले उचलावीत. भारताचे वैश्विक हितासाठीचे वैद्यकीय, गणिती आदी शास्त्रांतील प्राचीन योगदान जगासमोर आणावे. देशाच्या पुरातत्व ठेव्याविषयी अक्षम्य दुर्लक्ष करणार्या केंद्रशासनाच्या खात्यांवर सक्षम अधिकारी नेमून त्यांना मिळणार्या निधीचा सुयोग्य वापर करावा. हे सर्व होण्यासाठी मोदींनी भारतीय पंचांग देशात लागू करावे. भारतियांचा खोटा इतिहास पालटून खरा इतिहास लिहून घ्यावा. देशातील २०० विद्यापिठांचे राष्ट्रविरोधी कुलगुरु हटवावेत आणि हिंदूंमध्ये हिंदुत्वाचा अभिमान निर्माण करावा ! मी भाजपचा असलो, तरीही माझी मोदींकडे मागणी आहे की, त्यांनी या मागण्या त्वरित मान्य केल्या पाहिजेत !