विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : चंदीगड येथील ‘नॅशनल सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अँड कम्पॅरिटिव्ह स्टडी’चे अध्यक्ष श्री. नीरज अत्री ‘बुद्धीभेद करणार्या इतिहासाचे विकृतीकरण’ या विषयावर बोलतांना म्हणाले की, ‘राष्ट्रीय आणि शैक्षणिक संशोधन परिषदे’च्या (‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या) माध्यमातून या देशाची संस्कृती नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे. इतिहासाच्या पुस्तकांतून ‘ऋग्वेदातून दासप्रथेचा (गुलामांची प्रथा) उगम झाला’, असे सांगण्यात आले आहे. अहिंदू पंथांविषयी खोटी माहिती देऊन त्याविषयी एक सहानुभूती निर्माण करण्यात आली आहे. अशा अभ्यासामुळेच कन्हैयाकुमारसारखे विद्यार्थी सिद्ध होतात आणि देशविरोधी कृत्यांत सहभागी होतात. हे रोखण्यासाठी आपण माहितीच्या अधिकाराचा परिणामकारक वापर केला पाहिजे.
आम्ही ऋग्वेदाविषयी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’कडे माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवली. त्यांनी कोणताही संदर्भ नसल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या सांगण्यावरून आम्ही ‘जेएनयू’कडे विचारणा केल्यावर त्यांनी आमच्या आक्षेपांचे खोटेच उत्तर देऊन त्यात तथ्य नसल्याचे सांगितले; मात्र आम्ही त्याविषयीचे पुरावे गोळा करून ‘ब्रेनवॉश्ड रिपब्लिक’ ग्रंथ लिहिला.