‘विदेशी हिंदूंचे रक्षण’ या उद्बोधन सत्रात विदेशी हिंदूंच्या समस्यांना फुटली वाचा !
विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : दोनच आठवड्यांपूर्वी एका बौद्ध संघटनेने श्रीलंकेला ‘बौद्ध राष्ट्र’ घोषित केले. आज श्रीलंकेत २ जिल्हे मुसलमानबहुल आहेत; मात्र ३० वर्षांपूर्वी ३० टक्के असणारे हिंदू तेथे आता १५ टक्केे बनले आहेत. श्रीलंकेतील ख्रिस्त्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. तेथे नियोजनबद्धरितीने गोरगरिब हिंदूंना आर्थिक आमिषे दाखवून धर्मांतरित करण्यात येत आहे. त्यामुळे श्रीलंकेतील हिंदूंच्या रक्षणार्थ हिंदूंनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आशिया खंडातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांनी श्रीलंकेत येऊन तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी आम्हाला साहाय्य करावे, असे आवाहन श्रीलंकेतून अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी आलेले श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन यांनी केले. ते १५ जूनला झालेल्या ‘विदेशी हिंदूंचे रक्षण’ या उद्बोधन सत्रात बोलत होते. या सत्रामध्ये ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष, ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे पू. सिरियाक वाले आणि ‘भारत रक्षा मंच’चे श्री. मुरली मनोहर शर्मा यांनी मार्गदर्शन केेले.