विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : वर्ष १९४७ मध्ये भारतापासून पाक वेगळा झाला आणि त्यानंतर पाकने भारतावर आक्रमण केले. पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेतला. म्हणजे आता काश्मीर भारतापासून वेगळा झाला, तर ते भारताचे तिसरे विघटन होईल. त्याची सिद्धता म्हणून हिंदुबहुल जम्मूतील हिंदूंना नियोजनबद्ध रितीने हटवण्याचे प्रयत्न चालू आहेत. हे असेच चालू राहिले, तर देशभरात छोटे-छोटे काश्मीर सिद्ध व्हायला वेळ लागणार नाही आणि या देशाच्या आणखी फाळण्या होतील. हा विखारी जिहादी आतंकवाद, तसेच विघटनवाद यांवर विजय मिळवून देशाचे अखंडत्व अबाधित राखण्यासाठी ‘पनून कश्मीर’ची स्थापना हाच एकमेव मंत्र आहे, असे प्रतिपादन ‘पनून कश्मीर’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १५ जून या दिवशी झालेल्या ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या विषयावरील उद्बोधन सत्रात ते बोलत होते.
श्री. च्रोंगू म्हणाले पुढे की,
१. अफगाणिस्तान, पाकिस्तान नंतर आता काश्मीरमधून हिंदूंचा वंशविच्छेद करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. वर्ष १९९० मध्ये त्याचा केवळ अंशात्मक भाग कार्यान्वित करण्यात आला होता.
२. ‘जेव्हा वंशविच्छेदाची घटना घडते आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाते, तेव्हा पुन्हा पुन्हा त्या वंशविच्छेदाला सामोरे जावे लागते’, हे तत्त्व आहे. त्यामुळे हिंदूंच्या या वंशविच्छेदाला सडेतोड उत्तर म्हणून काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन सन्मानाने झालेच पाहिजे.
३. जम्मूमधील धर्मांध आत्मविश्वासाने सांगतात की, २-४ वर्षांत तेथून हिंदूंना हाकलून लावण्यात येईल. तेथेही हिंदूंची कोंडी करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
४. हे रोखण्यासाठी हिंदूंचे तेथे त्यांच्या स्थावर संपत्तीसह तेथे पुनर्वसन झाले पाहिजे. एकूणच जर ‘पनून कश्मीर’ झाले, तर ते या देशाची संस्कृती रक्षिण्यासाठी, अखंडता रहाण्यासाठी उत्प्रेरकाचे कार्य करेल.
हिंदु जनजागृती समितीने देशभरात ‘पनून कश्मीर’विषयी केलेले प्रबोधन हा भारताच्या अखंडतेसाठीचा नवा अध्याय ! – डॉ. अजय च्रोंगू
श्री. अजय च्रोंगू म्हणाले, ‘‘पनून कश्मीर’चे महत्त्व भारतात आम्ही अनेकांना समजून सांगत होतो; मात्र ते सर्वप्रथम कुणी खर्या अर्थाने समजून घेतले असेल, तर ते हिंदु जनजागृती समितीने. समितीने त्यासाठी ज्या पद्धतीने देशभरात प्रबोधन केले आणि त्यासमवेतच ‘एक भारत अभियाना’च्या माध्यमातून जागृती केली, तो एक भारताच्या अखंडतेसाठीचा नवीन अध्याय आहे.