रामनाथी, गोवा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की, संविधान कितीही चांगले असले तरी, त्यावर अंमल करणारे शासनकर्तेच असक्षम असतील, तर लोकशाही अपयशी ठरते. त्यानुसार आज संसदेत अनेक भ्रष्ट आणि गुन्हेगार सदस्य असल्याने लोकशाही फोल ठरल्याचे ७० वर्षांतच समोर येत आहे. लोकशाहीतील व्यवस्था पालटण्यासाठी समाजाने निद्रिस्त न रहाता लोकशाहीने उपलब्ध करून दिलेल्या मार्गांचा उपयोग करणे आवश्यक आहे. निदर्शने, जनहित याचिका, माहिती अधिकाराचा वापर, तक्रार-निवेदन आदी न्याय्य मार्गांचा अवलंब करून लोकशाहीतील सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात व्यापक लढा उभारणे अपेक्षित आहे. हा लढाच आदर्श व्यवस्थेच्या दिशेने म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल असेल, असेे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. ६ व्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनातील १६ जून या दिवशीच्या लोकशाहीमध्ये पसरलेल्या दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन या विषयावरील उद्बोधन सत्रामध्ये ते मार्गदर्शन करत होते.