विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १५ जून या दिवशी झालेल्या ‘‘मंदिर सरकारीकरणाला विरोध आणि मंदिरांच्या पावित्र्याचे रक्षण’ या विषयावरील उद्बोधन सत्रात ‘पुरातत्व विभागाचे हिंदुविरोधी नियम’ याविषयी मार्गदर्शन करतांना श्री. अनिल धीर यांनी सांगितले की, पुरातत्व विभाग हा वर्ष १८८२ मध्ये ब्रिटीशांनी चालू केला. त्यामध्ये आजपर्यंतच्या एकाही राज्यकर्त्याने कोणत्याही प्रकारची सुधारणा केलेली नाही. देशात यापूर्वी घडलेल्या घटना आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांविषयी विभागाने घेतलेली भूमिका ही हिंदुद्रोही असल्याचे दिसून येते. आताच्या शासनाकडून या विभागाविषयी अनेक अपेक्षा होत्या; परंतु अद्याप अपेक्षित असे पालट होऊ शकलेले नाही. सांस्कृतिक मंत्र्यांच्या अधिपत्याखाली विविध प्रकारची ३६ आस्थापने येत असून त्यात पुरातत्व विभागही येतो. त्या आस्थापनांच्या अधिकार्यांची मानसिकता ही साम्यवादी असून त्यांच्या जागी हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती मिळत नाही, हे खेदजनक आहे.