रामनाथी, गोवा – सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांनी करमणूक कर न भरल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने त्यांच्यावर गोव्यात बंदी घातली होती. त्यामुळे आयोजकांनी संत आणि राष्ट्रपुरुष यांची पवित्र भूमी असलेल्या पुण्यामध्ये या फेस्टिव्हलचे आयोजन डिसेंबर २०१६ मध्ये केले होते. यासाठी आयोजकांनी अवैधरित्या रस्ता बनवणे, झाडे तोडणे असे अनेक अपप्रकार केले होते. ज्या गावात त्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तेथे ग्रामपंचायतीने १० वर्षांपूर्वी संपूर्ण मद्यबंदी केली आहे. तरीही त्या कार्यक्रमात मद्यपान आणि अमली पदार्थांचे सेवन केले गेले; कारण शासन आणि प्रशासन यांनी त्यांना पाठिंबा देत विविध प्रकारच्या शासकीय अनुमत्या दिल्या होत्या. असे असले तरी हिंदुत्वनिष्ठांनी केलेला तीव्र विरोध आणि माहिती अधिकाराचा वापर यांमुळे आयोजकांना अवैध कारणांसाठी शासनाने एकूण ३ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड ठोठवला. आंदोलनाचे यश हे श्रीकृष्णकृपेनेच मिळाले, असे प्रतिपादन ‘हिंदु जनजागृती समिती’ चे श्री. अभिजीत देशमुख यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १६ जून या दिवशी झालेल्या ‘लोकशाहीमध्ये पसरलेल्या दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन’ या विषयावरील उद्बोधन सत्रात ते बोलत होते.