विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा – लाठी-गोली खाऐंगे, मंदिर वही बनाएंगे, असे म्हणायचे दिवस आता गेले आहेत. राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदूसंघटन आवश्यक आहे. राजकीय, प्रशासकीय असे कोणतेही साहाय्य नसतांनाही कोट्यवधी हिंदूंच्या संघटनातूनच अयोध्येत राममंदिराचे निर्माण होईल, असे प्रतिपादन तेलंगण राज्यातील गोशामहल मतदारसंघाचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. ते सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या तृतीय दिनी उपस्थितांना संबोधित करत होते. या वेळी व्यासपिठावर उज्जैन, मध्यप्रदेश येथील हिंदु शौर्य जागरण अभियानचे सचिव श्री. अरविंद जैन, जबलपूर, मध्यप्रदेश येथील हिंदु सेवा परिषदेचे संपर्कप्रमुख श्री. नितीन सोनपल्ली आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी उपस्थित होते.
आमदार टी. राजासिंह पुढे म्हणाले, सर्व प्रांतांत एकच अडचण आहे की, हिंदू विखुरलेले आहेत. हिंदूसंघटनात मोठी शक्ती आहे. हिंदू संघटित झाल्यामुळेच गेल्या ५ वर्षांत भाग्यनगरमध्ये एकाही गायीची हत्या झालेली नाही. आता आम्ही बैलांचीही हत्या होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. आता तुम्ही हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी स्वतंत्र आहात; पण जेव्हा तुम्ही राजकारणात प्रवेश करता, तेव्हा हिंदुत्वाचे कार्य करण्यावर अनेक निर्बंध येतात. हिंदूंचा सर्वनाश करणार्या अन्य पंथियांच्या विरोधात बोलू नका, राममंदिर, गोरक्षण यांविषयी बोलायचे नाही, वन्दे मातरम् न म्हणणार्यांच्या विरोधात काही बोलू नका, अशा अनेक सूचना वरून येऊ लागतात. काही लोकांना सत्तेत नसतांना राममंदिर आणि गोरक्षण आठवते. सत्तेत आल्यावर ते ही सारी सूत्रे विसरतात. असे लोक काय राममंदिराची स्थापना करतील ? ज्या राजकारणात जाऊन राममंदिर उभारण्याविषयी बोलताही येत नाही, त्या राजकारणाचा काय उपयोग ? राजकारणात येण्यापूर्वी १० वेळा विचार करा. त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात हिंदूसंघटन करा. त्यामुळे मतांचे राजकारण करणारा प्रत्येक राजकारणी स्वतःहून तुमच्याकडे येऊन तुमचे समर्थन मागेल.
आमदार श्री. टी. राजासिंह यांनी कथन केलेले काही अनुभव आणि राजकारणात राहून कार्य करतांना आलेले कटू अनुभव
या वेळी टी. राजासिंह यांनी राजकारणात राहून हिंदुत्वरक्षणाचे केलेले साहसी कार्य आणि त्याला पक्षांतर्गत झालेला विरोध, यांविषयी आर्ततेने पुढील अनुभव मांडले.
१. केरळमध्ये रा.स्व. संघाचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या केल्या जात आहेत. त्या केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या एका मोठ्या सभेचे आयोजन माझ्या मतदारसंघात करण्यात आले होते. आम्ही पोलिसांना सांगितले, केरळच्या मुख्यमंत्र्यांच्याच सभास्थळाच्या बाजूला माझेही व्यासपीठ असेल. तेथून गोरक्षणाविषयी आम्ही बोलणार आहोत. त्यासाठी आम्हाला अनुमती द्या. मुख्यमंत्र्यांच्या सभेचा प्रचार झाला होता. आम्हीही सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रचार केला. परिणामी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून मुख्यमंत्र्यांची सभा तेथून रहित करण्यात आली. यानंतर पक्षाने मला विचारले, मुख्यमंत्र्यांची सभा रहित करण्याचे अधिकार तुम्हाला कुणी दिले ? आम्ही उत्तर दिले, वर्ष १९६९ मध्ये रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या मुख्यमंत्र्यांची सभा मी माझ्या मतदारसंघात होऊ देणार नाही.
२. चांगले कार्य केले, तर लोक लक्षात ठेवतील. मला अनेक क्रांतीकारकांचे स्मरण होते. त्यांनी धर्मासाठी मोठे कार्य केले आहे. आपण सर्व भाग्यवान आहोत. आपण अखंड हिंदु राष्ट्रासाठी लढत आहोत. देवाने आपल्यासाठी हे कार्य लिहिले आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे बनायचे आहे. त्यासाठी संघटित झाले पाहिजे.
३. तेलंगण सरकारकडून होत असलेले धर्मांधांचे लांगूलचालन !
सध्या रमझानचा महिना चालू आहे. तेलंगण सरकारने रमझानसाठी ८ कोटी रुपये अनुदान दिले आहे. नमाजाला येणार्यांना पाण्याची पाकिटे देण्यासाठी सरकारने ५ कोटी रुपये दिले आहेत. महानगरपालिकांना नमाजाच्या ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी ५ कोटी रुपये दिले आहेत. राज्यातील ५०० मशिदींना प्रत्येकी २ लाख रुपये दिले आहेत. प्रत्येक व्यक्तीला ५ किलो तांदूळ आणि बिर्याणी मसाला देण्यासाठी तो निधी आहे. राज्यात मुसलमानांना १२ टक्के आरक्षण आहे. एवढे आरक्षण कुठेच नाही.
४. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची अपकीर्ती करणार्या माध्यमांचा सडेतोड प्रतिवाद
अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी हे अधिवेशन प्रतिवर्षी आयोजित करण्यात येते. याही वर्षी अधिवेशनाला पुष्कळ चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असूनही गेल्या काही दिवसांपासून सामाजिक प्रसारमाध्यमे आणि देशातील दिखाऊ माध्यमांमध्ये खळबळ उडाली आहे. काय होत आहे फोंड्यात ? हिंदू आतंकवादी निर्माण केले जात आहेत का ?, असे वातावरण दिखाऊ माध्यमे निर्माण करत आहेत. वास्तविक अयोध्येत भव्य राममंदिराची उभारणी करणे, अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, गोरक्षण आदी सूत्रांवर हिंदूंचे संघटन होऊन त्यात यश यावे, एवढाच हिंदु जनजागृती समितीचा उद्देश आहे.