विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : गेल्या ५ वर्षांत हिंदु विधीज्ञ परिषदेने वैचारिक आतंकवाद निर्माण करणार्या अनेक संघटनांची कारस्थाने हाणून पाडली. हिंदुत्वनिष्ठांना अटक करून त्यांच्या संघटनांना विविध प्रकारे त्रास देण्याचे राजकारणी आणि पोलीस प्रशासन यांचे प्रयत्न परिषदेने अयशस्वी केले. माहितीच्या अधिकाराचा राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी वापर करत परिषदेकडून मशिदींवरील अवैध भोंगे उतरवणे, कथित सामाजिक संस्थांचे आर्थिक घोटाळे उघड करणे आदी कार्य केले जात आहे. परिषदेने केलेल्या याचिकेमुळे हिंदु धर्म आणि हिंदुत्व यांविरोधात अत्यंत हीन पातळीला जाऊन टीका करणार्या प्रसिद्धीमाध्यमांवर अंकुश ठेवण्यासाठी समितीची स्थापना करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासनाला दिला. हिंदु राष्ट्र येईपर्यंत हिंदु विधीज्ञ परिषद हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे संघटन, त्यांना लागणारे साहाय्य, भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती करणे आदी कार्य करत राहील. असे प्रतिपादन हिंदु विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १६ जून या दिवशी झालेल्या राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणार्थ केलेल्या संघर्षाच्या अनुभवकथनाच्या सत्रात ते बोलत होते.