Menu Close

प.पू. परशराम पांडे महाराज यांनी ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी दिलेला संदेश ! 

हिंदु राष्ट्र येण्यासाठी स्वतःतील चैतन्यशक्ती जागृत करून त्याद्वारे कार्य करणे आवश्यक !

प.पू. परशराम पांडे महाराज

‘उपस्थित महनीय, सज्जन, देशप्रेमासाठी आहुती देणारे, सनातन धर्म राज्य (हिंदु राष्ट्र) येण्यासाठी तळमळणारे, आपापल्या कार्याच्या ठिकाणी समृद्ध आणि अनुभवसिद्ध असणारे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी लीन होऊन कार्य करणारे, त्यांची कृपा संपादन करणारे, अशा धर्माभिमानी हिंदूंनो, आज मला आपल्यापुढे आत्मनिवेदन करण्याची संधी मिळाली आहे, हे मी माझे भाग्य समजतो. सनातन धर्म राज्य येण्यासाठी हे हिंदू अधिवेशन प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित केले जात आहे. त्यासाठी आज आपण ६ व्यांदा एकत्र येत आहोत.  आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाची फलश्रुती आपल्या सर्वांकडून चांगल्या प्रकारे पार पडली असून त्याचा परिणामही आज मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

१. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होणे, म्हणजे स्वतःचे भाग्य उजळून घेणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातन धर्म राज्याची संकल्पना सनातन संस्था स्थापन करण्यापूर्वीच केलेली आहे. त्यांनी सांगितले आहे, ‘वर्ष २०२३ मध्ये सनातन धर्म राज्य येणारच आहे.’ त्या दृष्टीने त्याची पूर्वसिद्धता झालेली आहे. तेव्हा आता आपल्याला केवळ त्यात सहभागी होऊन साधना करून आपले भाग्य उजळून घ्यायचे आहे. आजच्या स्थितीत हिंदूंवर होत असलेले अत्याचार आणि देशाची भयानक अन् दयनीय स्थिती पहाता आपल्यासारखे धर्माभिमानी या कार्यात सहकार्य करत आहेत, हे महान भाग्य आहे. सनातन धर्म राज्याची स्थापना झाल्यावर हिंदु धर्माभिमान्यांकडून होणारे निरनिराळे धर्मकार्य एका छत्राखाली चालणार आहे. यासाठी सर्वांनी संघटित होऊन सनातन धर्म राज्याची स्थापना करण्याची इतिकर्तव्यता जाणून त्यानुसार कार्य करायचे आहे. सध्या आपण आपापले वेगवेगळे ध्येय ठेवून कार्य करत आहोत. यामध्ये आपण प्रथम ‘हिंदु राष्ट्र’ आणणे हे ध्येय समोर ठेवून कार्य केल्यास आपल्या संघटित शक्तीच्या प्रभावामुळे हिंदु राष्ट्र येईलच. हिंदु राष्ट्र आल्यावर सध्या आपण प्रत्येक जण वेगवेगळे ध्येय पूर्ण करण्यासाठी कार्य करत आहोत, ते कार्य आपणास सहज-सुलभतेने साध्य करता येईल.

२. श्रीमद्भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या वचनाप्रमाणे कार्य करणे आवश्यक ! : ऐन युद्धप्रसंगी अर्जुनासारखा सामर्थ्यशाली क्षत्रिय जेव्हा गळून गेला होता, तेव्हा श्रीकृष्णाने त्याला युद्धाविषयी काही न सांगता केवळ साधनेविषयीच सांगितले.

२ अ. ‘स्व’चा विचार न करता झोकून देऊन कार्य करणे

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्‍चयः॥

– श्रीमद्भगवद्गीता अध्याय २, श्‍लोक ३७

अर्थ : युद्धात तू मारला गेलास, तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास, तर पृथ्वीचे राज्य भोगशील; म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्‍चय करून उभा रहा.

‘भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले, आपणच आमच्याकडून सामर्थ्याने कार्य करवून घ्या आणि त्यात यश मिळवून द्या’, अशी आपल्या चरणी कोटी कोटी प्रार्थना करतो.’

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *