रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात दोन दिवसीय अधिवेशनास प्रारंभ
रामनाथी (गोवा) : हिंदूंच्या हितासाठी लढतांना सर्वच स्तरांवर विरोध सहन करावा लागतो; मात्र या स्थितीतही स्थिर राहून चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहून आणि मन लावून हिंदुत्वासाठी कार्य केले पाहिजे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी चारित्र्यसंपन्न आणि धर्मबलसंपन्न अधिवक्त्यांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेश येथील हिंदु फ्रंट फॉर जस्टिस या संघटनेचे अध्यक्ष तथा उत्तरप्रदेश उच्च न्यायालयातील अधिवक्ता हरिशंकर जैन यांनी केले.
१७ जूनपासून येथील सनातनच्या आश्रमात हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने दोन दिवसीय अधिवक्ता अधिवेशनाला प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, इस्लामीकरणामुळे नष्ट झालेल्या आणि हिंदु अस्मितेशी निगडित सर्व गोष्टी शोधल्या गेल्या पाहिजेत. सध्याच्या धर्मांधांच्या वाढत्या प्रस्थाला कायद्याने आळा घातला जाऊ शकतो. अधिवक्त्यांकडे कायद्याचे शस्त्र आहे, त्याचा वापर करून हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण केले पाहिजे.
या वेळी संभाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर; लखनौ, उत्तरप्रदेश अधिवक्ता हरिशंकर जैन आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य तथा संभाजीनगर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांनी दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन केले. प्रारंभी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील साधक-पुरोहित श्री. अमर जोशी यांनी शंखनाद केला. स्वातंत्र्यपूर्व काळात अधिवक्त्यांचे योगदान देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचे ठरले होते. त्याचप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीही अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे हिंदु विधीज्ञ परिषदेच्या गोवा कार्यालयाच्या समन्वयक अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे यांनी प्रस्तावनेत सांगितले. या वेळी सनातनच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी वकिली व्यवसाय करतांना आनंदी रहाण्यासाठी करायची साधना, या विषयावर अधिवक्त्यांना संबोधित केले.
हिंदु धर्म आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर होणार्या आरोपांच्या विरोधात अधिवक्त्यांनी तत्परतेने कृती करणे आवश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, हिंदु धर्म आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर होणार्या आरोपांच्या विरोधात अधिवक्त्यांनी तत्परतेने कृती करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात अधिवक्त्यांनी तन-मन-धनाने सहभागी व्हावे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आवश्यक ते प्रयत्न प्राधान्याने करणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्यच आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेचे कार्य विशिष्ट गोष्टींपुरते मर्यादित नसून ते व्यापक स्तरावरील आहे. हिंदुत्वनिष्ठांचा छळ करणार्यांच्या विरोधात परिषदेने प्रत्येक स्तरावर कार्य केले असून माहिती अधिकाराचा वापर करत कायदेशीर प्रक्रियेद्वारे हिंदुत्वाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असायला हवे.
हिंदुत्वनिष्ठांना धर्मकार्यासाठी बळ मिळावे, यासाठी अधिवक्त्यांनी साहाय्य करावे ! – श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
हिंदूहितासाठी लढतांना हिंदुत्वनिष्ठांच्या मागे अधिवक्ते उभे राहिल्यास हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे कुटुंबीय यांना आधार मिळतो. हिंदूंना साहाय्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी कायद्याची प्राथमिक माहिती देणे, माहिती अधिकाराचा वापर करणे, यांविषयी हिंदुत्वनिष्ठांना अधिवक्ते मार्गदर्शन करू शकतात. अधिवक्त्यांच्या साहाय्यामुळे हिंदुत्वनिष्ठांना धर्मकार्यासाठी आणखी बळ मिळू शकते, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात