अमरावती येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला मातेसमान वागणूक देण्याचा आदर्श घालून दिला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांचे आरोप सिद्ध न होता त्यांचाही अमानुष छळ करण्यात आला. आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर ही वेळ आलीच नसती. आमच्या मातेसमान असलेल्या साध्वींचा छळ करणार्यांवर कठोर कारवाई करावी, असे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. नरेंद्र केवले यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने स्थानिक राजकमल चौक येथे १३ जून या दिवशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. आंदोलनातील मागण्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी श्री. परदेसी यांना १४ जून या दिवशी निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदन पुढे पाठवणार असल्याचे सांगितले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित म्हणाले, ‘‘कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला दोन वर्षांपूर्वी रासायनिक लेप लावण्यात आला; पण तत्पूर्वी हिंदु धर्मातील संतांचे मार्गदर्शन घ्यायला हवे होते. धर्मशिक्षणाअभावी संतांचे महत्त्व नसल्याने अयोग्य कृती केल्या जातात. असे करणार्यांना कठोर शासन द्यावे.’’
या वेळी श्री योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत खत्री, सनातन संस्थेच्या सौ. विभा चौधरी यांनीही मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना मावळे यांनी केले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. महेश लडके, श्री. करण धोटे यांसह एकूण ४० हून अधिक जण उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात